• कचरा न उचलण्याचा महापालिकेचा निर्णय;
  • उद्योग क्षेत्र म्हणते, ही पालिकेचीच जबाबदारी!

वसईच्या औद्य्ोगिक क्षेत्रातील ज्वालाग्राही औद्य्ोगिक कचऱ्याचा प्रश्न दिवसेंदिवस बिकट होत चालला आहे. हा कचरा ठेकेदार उचलणार नसून औद्य्ोगिक कंपन्यांनीच त्याची विल्हेवाट लावायची आहे, अशी ठाम भूमिका महापालिकेने घेतली आहे, तर आम्ही या कचऱ्याची विल्हेवाट लावू शकत नाही, असे उद्योग क्षेत्राने स्पष्ट केले आहे. यामुळे वसई पूर्वेच्या औद्योगिक परिसरात शेकडो टन कचरा साचत असून रहिवाशांचे आरोग्य धोक्यात आले आहे.

वसई पूर्वेच्या नवघरमध्ये १९८० साली औद्योगिक वसाहतींची स्थापना झाली. १९९० ते २००० या दहा वर्षांंच्या कालावधीत या ठिकाणी औद्य्ोगिक कंपन्यांची भरभराट झाली. आजमितीस या ठिकाणी ३००हून सूक्ष्म आणि लघुउद्योग आहेत. २५ ते ३० हजार कर्मचारी या ठिकाणी काम करतात. या औद्य्ोगिक वसाहतींमध्ये ६० टक्के उद्योग अभियांत्रिकी संबंधित आहेत, तर ४० टक्के उद्योग कातडे, प्लॅस्टिक, पॅकेजिंग आदींशी संबंधित आहेत. या ४० टक्के उद्योगातून मोठय़ा प्रमाणावार ज्वलनशील आणि धोकादायक औद्य्ोगिक कचऱ्याची निर्मिती होत असते.

महापालिकेमार्फत कचऱ्याची विल्हेवाट लावली जात असते. हा कचरा उचलून तो क्षेपणभूमीत टाकला जात असे. ज्वलनशील कचरा क्षेपणभूमीत टाकल्याने आगी लागणे तसेच विषारी वायूची निर्मित होत असते. त्यामुळे  महाराष्ट्र प्रदूषण नियामक मंडळ आणि हरित लवादाने घनकचरा व्यवस्थापनातील नियमांचा आधार घेत वसई-विरार महापालिकेने औद्योगिक क्षेत्रातील ज्वलनशील आणि धोकादायक कचरा उचलू नये, असे आदेश दिले आहेत. यामुळे पालिकेच्या कचरा उचलणाऱ्या ठेकेदाराने नवघर पूर्वेला असणाऱ्या औद्य्ोगिक क्षेत्रातील ज्वलनशील कचरा उचलण्याचे बंद केले आहे.

औद्योगिक क्षेत्रातील कंपन्यांनी हा कचरा तळोजा येथे नेऊन त्याची विल्हेवाट लावण्याचे आदेश दिले आहेत.अचानक या नियमांचा आधार घेत कचरा उचलणे बंद केल्याने औद्य्ोगिक क्षेत्रातील कंपन्यांपुढे मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.

रहिवाशांचे आरोग्य धोक्यात

दिवसेंदिवस या ज्वलनशील आणि हानीकारक कचऱ्याचे ढीग साचत असल्याने पूर्वेकडील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. एरवी इतर नियमांचे पालन न करणारी पालिका याच बाबतीत एवढी तत्पर का, असा सवाल वसई इंडस्ट्रियल असोसिएशनने केला आहे. याबाबत स्थानिक नगरसेविका आणि शिवसेनेच्या गटनेत्या किरण चेंदवणकर यांनी पालिकेनेचे तोडगा काढण्याची भूमिका घेतली आहे. यामुळे येथील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाल्याचे त्यांनी सांगितले. जर या ज्वलनशील कचऱ्याला आगी लावण्याचा प्रयत्न केल्यास मोठी भीषण परिस्थिती निर्माण होणार आहे.

महापालिकेने कोणतीही कल्पना न देता हा निर्णय आमच्यावर अक्षरश: लादलेला आहे. यापूर्वी ग्रामपंचायत आणि नगरपरिषद असताना हा विषय कधी आला नाही. नगरपरिषद असताना त्यांनी ज्वलनशील कचरा वेगळा उचलण्याचे प्रयत्न केले होते. आम्ही हा कचरा उचलू शकत नाही. महापालिकेने अचानक आमच्यावर हा हातोडा चालवला आहे. ज्वलनशीन कचरा निघतो म्हणून आम्ही आमचे काम बंद करू शकत नाही.

अनिल अंबर्डेकर, वसई इंडस्ट्रियल असोसिएशन

हा कचरा आम्ही उचलणार नाही. घनकचरा व्यवस्थापनातच तसा नियम आहे. आम्ही घरगुती औद्योगिक कचरा उचलत आहोत. परंतु हे औद्य्ोगिक कंपनीचे काही लोक या घरगुती कचऱ्यातच ज्वलनशील कचरा मिसळत असल्याच्या तक्रारी आल्या आहेत. पालिकेला फसवण्याचा हा गंभीर प्रकार आहे. तसे झाल्यास आम्ही त्यांचा घरगुती कचराही उचलणार नाही. हा निर्णय घेण्यापूर्वी वसई इंडस्ट्रियल असोसिएशनच्या लोकांना कल्पना दिली होती. आणि आता हा प्रश्न त्यांनीच सोडवायचा आहे.

सुखदेव दरवेशी, प्रभारी साहाय्यक आयुक्त.