28 January 2021

News Flash

फुलपाखरांच्या जगात : कमांडर

कमांडर हे निम्फेलिडे कुळातील आणखी एक फुलपाखरू. साधारण मध्यम आकाराचे असते. याच्या पंखांची वरची बाजू काळपट लाल रंगाची असते. पुढच्या आणि मागच्या पंखांवर असणारे पांढरे

कमांडर हे निम्फेलिडे कुळातील आणखी एक फुलपाखरू. साधारण मध्यम आकाराचे असते. याच्या पंखांची वरची बाजू काळपट लाल रंगाची असते. पुढच्या आणि मागच्या पंखांवर असणारे पांढरे मोठे ठिपके इंग्रजी व्ही आकारात असतात. कमांडर फुलपाखरू ओळखण्याची ही महत्त्वाची खूण आहे. या पांढऱ्या व्ही खाली काळ्या ठिपक्यांच्या तीन रांगा असतात शिवाय पांढऱ्या व्हीच्या आत काळ्याच ठिपक्यांच्या २/३ रांगा असतात.

पुढच्या आणि मागच्या दोन्ही पंखांची कडा कातर असते आणि त्यावर पांढऱ्या तुटक रेषेची नक्षीही असते. या फुलपाखराचे धड आणि पायही पांढरे असतात. पंखांच्या खालच्या बाजूसही फिक्कट लालसर रंगावर पांढरा व्ही रेखलेला असतो. कमांडर फुलपाखरू हे संपूर्ण दक्षिण आशियामध्ये हमखास बघायला मिळते. त्यातही आपल्या सह्य़ाद्रीसारख्या भरपूर पावसाच्या प्रदेशात समुद्रसपाटीपासून ४०० मि. उंचीपर्यंत यांची नोंद झालेली आहे.

ही फुलपाखरे गर्द झाडी किंवा जंगलाजवळची उघडी माळराने, रस्त्याकडचे गवताळ पट्टे, पाणथळ किंवा पाणी वाहत असलेल्या जागा, उडण्यासाठी जास्त पसंत करतात. यांचे उडणे हे झपझप पंख मारून नंतर निवांत तरंगत राहणे असे असते. पंखांची उघडझाप होताना यांच्या पंखांवरचा पांढरा व्ही आकाराचा पट्टा तांबूस रंगावर सुरेख उठून दिसतो. यांना फुलांवर बसून मध पिण्याबरोबरच चिखलावर बसून क्षार शोषणेही आवडते. गमतीचा भाग म्हणजे गाईगुरांच्या मूत्राने ओली झालेली जागा यांना फार आवडते.

ही फुलपाखरे कदंब आणि इतर झाडांवर अंडी घालतात. अंडी फिक्कट हिरव्या रंगाची, शंकूकृती असतात. अंडय़ांमधून बाहेर येणारे सुरवंट मातकट रंगाचे असतात. हे सुरवंट पानाचा सर्व भाग खाऊन फक्त शिरा शिल्लक ठेवतात. पानाच्या मध्यावर असणाऱ्या शिरेवर यांचा मुक्काम असतो. आपल्यापर्यंत कोणी किडा मुंगी येऊ नये म्हणून हे सुरवंट आपल्याच विष्ठेची तटबंदी उभारतात. खरोखरच यामुळे त्यांचे शत्रू दूर राहतात.

या सुरवंटांची वाढ पूर्ण झाली की ते खाद्य झाडाचा आसरा सोडतात  आणि पालापाचोळ्यात शिरून कोश विणतात. या कोशाचा रंग वाळलेल्या पाचोळ्यासारखाच असतो. त्यामुळे त्याचे अस्तित्व लपून राहते.

अंडय़ांपासून फुलपाखरू व्हायला साधारणत: महिना लागतो.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 21, 2016 4:10 am

Web Title: commander butterfly
Next Stories
1 दारबदलामुळे दिव्यातील गर्दीला वाट
2 पतसंस्थांमधील काळ्या पैशाची झाडाझडती
3 उद्वाहकात अडकून रहिवाशांची घुसमट
Just Now!
X