जयेश सामंत

मुंबईतील वांद्रे-कुर्ला व्यावसायिक संकुलाच्या धर्तीवर रायगडमध्ये नवे केंद्र उभारण्याच्या हालचाली सुरू आहेत. मुंबई महानगर विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) त्यासाठी रायगडमध्ये ५०० एकरपेक्षा अधिक क्षेत्रफळाची जमीन खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे.

हिंदूस्थान ऑरगॅनिक केमिकल्स लिमिटेड या केंद्र सरकारच्या कंपनीसाठी रायगड जिल्ह्य़ातील पनवेल तालुक्यातील मौजे तुराडे, पोसरी, देवळोली, सावळे, दापिवली आणि खालापूर तालुक्यात मौजे पराडे, वासंबे, आंबिवली-तुंगारतन येथे साठच्या दशकात १,०१२ एकर जमीन संपादित करण्यात आली होती. ही कंपीन पुढे अवसायनात निघाल्याने रसायनी येथील प्रकल्पातील मिळकतींच्या विक्रीस परवानगी देण्यात आली. त्यामुळे केंद्र आणि राज्य सरकारच्या परवानगीने काही वर्षांपूर्वी १,०१२ एकरपैकी ६८४ एकर जमीन भारत पेट्रोलियम कंपनीला विकण्यास हिरवा कंदील मिळाला तर २० एकर जागा इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन (इस्त्रो) यांनी खरेदी केली. या व्यवहारानंतर अद्यापही २६८ एकर जमीन कंपनीकडे शिल्लक असून, पनवेल शहरास लागूनच आणखी आठ एकर जमीनही कंपनीने विक्रीसाठी खुली केली आहे. गेल्या वर्षी जुलै महिन्यात कंपनीने महानगर विकास प्राधिकरणाला जमीन विक्रीसंबंधी प्रस्ताव सादर करत देकार मागविला होता.

खरेदीसाठी ९६३ कोटींची तयारी

पनवेल आणि खालापूर तालुक्यातील २६८ एकर जमिनीबरोबरच आणखी २४५ एकर अशी एकूण ५०० एकरापेक्षा अधिक क्षेत्रफळाची जमीन खरेदीसाठी महानगर विकास प्राधिकरणाने ९६३ कोटी रुपयांचा प्रस्ताव तयार केला आहे. नुकत्याच झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत त्यास मान्यताही देण्यात आली आहे. या सर्व जमिनी मुंबई-पुणे राष्ट्रीय महामार्गापासून चार किलोमीटरवर असून, रसायनी रेल्वे स्थानकापासून पनवेल-पेण प्रस्तावित लोकल सेवा सुरु झाल्यास या विभागातील विकासाला चालना मिळू शकेल, असा प्राधिकरणाचा दावा आहे. सिडकोच्या नैना आणि महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या अखत्यारित येणाऱ्या परिसरास हा सर्व भाग लागून असल्याने विकास केंद्रासाठी आणि भविष्यातील औद्योगिक विकासासाठी हा परिसर योग्य असल्याचा प्रस्ताव आहे.

मुंबई महानगर प्राधिकरणाने हिंदूस्थान ऑरगॅनिक केमिकल्स कंपनीशी सामंजस्य करार करुन ठरविलेला दर अथवा प्रत्यक्ष खरेदीखताच्या दिवशी लागू असणाऱ्या सरकारी दरांपैकी कमी असलेल्या रकमेनुसार ही जमीन खरेदी करावी, असा ठराव संचालक मंडळाच्या बैठकीत मान्य करण्यात आला. याशिवाय संपादित जमिनीपैकी ज्या जमीन अतिक्रमणविरहीत आहेत त्या तत्काळ खरेदीचा प्रस्तावही मांडण्यात आला आहे.

मुंबई शहर आणि उपनगरात जागेची उपलब्धता नसल्यामुळे महानगर प्रदेशात जमीन विकत घेऊन व्यावसायिक केंद्राची उभारणी योग्य ठरेल. वांद्रे-कुर्ला संकुलाच्या धर्तीवर तिथे नवे केंद्र उभे राहू शकते. त्यासाठीच ९०० कोटींपेक्षा अधिक रकमेच्या जमीन खरेदीचा प्रस्ताव आहे. राज्य सरकारच्या निर्णयानंतर ‘एमएमआरडीए’च्या प्रस्तावावर कार्यवाही सुरु होईल.

एकनाथ शिंदे, नगरविकास मंत्री