अभ्यास करून प्रस्ताव तयार करण्याचे आयुक्तांचे आदेश

ठाणे शहरात पर्यटनाला चालना देण्यासाठी खाडीकिनारी भागात खारफुटी सफारी सुरू करण्यासाठी सविस्तर अभ्यास करून प्रस्ताव सादर करण्याचे आदेश आयुक्त संजीव जयस्वाल यांनी बुधवारी उद्यान विभागाला दिले आहेत.

ठाणे शहराला मोठय़ा प्रमाणात खाडीकिनारा लाभलेला आहे. या खाडीकिनारी भागात महापालिकेकडून सुशोभीकरणाचे प्रस्ताव राबविले जात आहेत. तसेच जलवाहतूक प्रकल्प, पारसिक आणि गायमुख चौपाटी असे प्रकल्पही पालिका राबवीत आहे. शहरातील पर्यटनाला चालना मिळावी या उद्देशातून हे प्रकल्प राबविले जात आहेत. त्यापाठोपाठ आता खाडीकिनारी भागात खारफुटी सफारी सुरू करण्याचा विचार महापालिकेने सुरू केला असून बुधवारी महापालिकेत झालेल्या बैठकीमध्ये आयुक्त संजीव जयस्वाल यांनी या प्रकल्पाबाबत अधिकाऱ्यांशी चर्चा केली. या बैठकीला अतिरिक्त आयुक्त राजेंद्र अहिवर आणि समीर उन्हाळे यांच्यासह ईवाय या सल्लागार संस्थेचे वरिष्ठ प्रबंधक रुचिर राज आणि महापालिकेचे अधिकारी उपस्थित होते. या बैठकीमध्ये खाडीकिनारी भागात खारफुटी सफारी सुरू करण्यासाठी सविस्तर अभ्यास करून त्यासंबंधीचा प्रस्ताव सादर करण्याचे आदेश त्यांनी दिले.

स्थावर मालमत्ता विभागाचे उत्पन्न वाढविण्यासाठी डिजिटायझेशन करण्याचा प्रस्ताव सादर करण्याचे आदेश त्यांनी संबंधित विभागाला दिले आहेत. पालिकेच्या शहर विकास विभागाच्या माध्यमातून बांधकाम परवानगी देताना जागतिक बँकेच्या नियमावलीची अंमलबजावणी कशी करता येईल यासाठी ईवाय या संस्थेने अभ्यास करून अहवाल सादर करावा, अशा सूचनाही त्यांनी दिल्या. पुढील तीन महिन्यांत सार्वजनिक आणि सामूहिक शौचालयांचे अद्ययावतीकरण करण्यासाठी कृती आराखडा तयार करून द्यावा, अशा सूचनाही त्यांनी या वेळी केल्या.