ठाणे रेल्वे स्थानक परिसरात सीसीटीव्ही बसवणार, नियंत्रण कक्ष पालिका मुख्यालयात

वारंवार कारवाई करूनही रस्ते, पदपथांवर ठाण मांडून वाहतूक कोंडी करणाऱ्या ठाणे रेल्वे स्थानक परिसरातील फेरीवाल्यांना रोखण्यासाठी आयुक्तांनी आता तंत्रज्ञानाची मदत घेतली आहे. स्थानक परिसरात येत्या काळात सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे जाळे उभारण्यात येणार असून त्याचा नियंत्रण कक्ष महापालिका मुख्यालयात असणार आहे. स्वत: महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल हे या चित्रीकरणावर लक्ष ठेवून असणार आहेत. त्यामुळे फेरीवाल्यांवर नियमित कारवाई केल्याचे फसवे दावे करणारे प्रभाग अधिकारी व कर्मचारी यांचे ‘सीसीटीव्ही’ दृश्यांतून पितळ उघडे पडण्याची चिन्हे आहेत.
ठाणे रेल्वे स्थानक परिसर कोंडीमुक्त व्हावा यासाठी गेल्या काही दिवसांपासून महापालिका प्रशासनाने जोरदार मोहीम हाती घेतली आहे. जुना स्थानक रोड, सुभाष पथ, शिवाजी पथ तसेच जांभळी नाका या संपूर्ण परिसराच्या रुंदीकरणाचे काम महापालिकेने हाती घेतले असून या कामात अडथळा ठरत असलेल्या बेकायदा बांधकामांवर हातोडा चालविण्यात आला आहे. लवकरच या परिसरात नव्या रस्त्याचे काम हाती घेतले जाणार आहे. या नव्या रस्त्यावर फेरीवाल्यांनी ठाण मांडू नये यासाठी महापालिकेने पावले उचलली असून हा संपूर्ण परिसर सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या निगराणीत आणला जाणार आहे, अशी माहिती आयुक्त जयस्वाल यांनी दिली.
रेल्वे स्थानक परिसर फेरीवालामुक्त व्हावा यासंबंधी प्रभाग स्तरावर वारंवार आदेश देण्यात येत असतात. त्यानंतरही या भागात फेरीवाल्यांचा उपद्रव कायम असतो. महापालिकेच्या पथकामार्फत नियमित कारवाई होते, तरीही हा उपद्रव थांबलेला नाही. त्यामुळे यापुढे खासगी संस्थेमार्फत फेरीवाल्यांवर नियंत्रण ठेवण्याचे काम केले जाईल, असेही आयुक्तांनी स्पष्ट केले. स्थानिक व्यापाऱ्यांच्या मदतीने तसेच महापालिकेच्या खर्चातून सीसीटीव्ही कॅमेरे उभारले जातील. या कॅमेऱ्यांचा नियंत्रण कक्ष महापालिका मुख्यालयात असेल. त्यामुळे स्टेशन परिसरात फेरीवाले आहेत किंवा नाही हे आयुक्त किंवा अतिक्रमण विभागाच्या प्रमुखास वेळोवेळी पाहता येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. स्थानिक पोलीस ठाणे तसेच प्रभाग कार्यालयातही कॅमेऱ्याच्या जोडण्या दिल्या जातील, अशी माहिती जयस्वाल यांनी दिली.