गुन्हा दाखल करण्याचे समितेचे आदेश

भाईंदर : माजी आमदार नरेंद्र मेहता यांच्यावर अट्रॉसिटी आणि लैगिक शोषण प्रकरणी  गुन्हा दाखल करणाऱ्या भाजप नगरसेविका नीला सोन्सचे जात प्रमाणपत्र बोगस असल्याचा निर्णय जिल्हा जात प्रमाणपत्र पळताळणी समिती मुंबई उपनगर यांनी दिला आहे. तसेच नागरसेविकांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश समितीने दिले.

मीरा-भाईंदरचे माजी आमदार नरेंद्र मेहता यांच्यावर २६ फेब्रुवारी २०२० रोजी मीरा रोड पोलीस ठाण्यात लैंगिक शोषण, अ‍ॅट्रोसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. परंतु  खोटय़ा जात प्रमाणपत्राद्वारे अ‍ॅट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असल्याचे आरोप करण्यात आले होते. त्यानुसार विजय पावर आणि रोहित सुवर्ण यांनी जिल्हा जात प्रमाणपत्र पळताळणी समिती मुंबई उपनगर येथे जात पळताळणीची मागणी केली होती. १० ऑगस्ट रोजी नगरसेविकेचे जात प्रमाणपत्र बोगस असल्याचे समोर आले असून नागरसेविकेविरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या निर्णयाला आपण उच्च न्यायालयात आवाहन देणार असल्याची माहिती नीला सोन्स यांनी दिली, तर सादर केलेले कागदपत्रे बनावट असल्याचे मला पूर्वीपासून माहीत होते अशी प्रतिक्रिया आमदार नरेंद्र मेहता यांनी दिली.