गुढी पाडव्याला ठाणेकरांच्या उत्साहपूर्ण सहभागातून साजऱ्या होणाऱ्या नववर्ष स्वागत यात्रेचे यंदा चौदावे वर्ष आहे. २००२ मध्ये सुरू झालेल्या ठाण्याच्या स्वागतयात्रेत सर्व भाषा, धर्म, पंथांतील सुसंस्कृत नागरिक सहभागी होत असतात. त्यामुळे नववर्ष स्वागतयात्रेचा उत्सव ठाणेकरांच्या समृद्ध सांस्कृतिक श्रीमंतीचा अविभाज्य भाग बनला आहे. ठाण्यातील या वैशिष्टय़पूर्ण स्वागतयात्रेचे यंदाचे एकूण नियोजन, पूर्वतयारी या निमित्ताने श्री कौपीनेश्वर सांस्कृतिक न्यासाचे अध्यक्ष मा. य. गोखले यांच्याशी श्रीकांत सावंत यांनी साधलेला संवाद
मा. य. गोखले
अध्यक्ष, श्री कौपीनेश्वर सांस्कृतिक न्यास
* ठाण्याच्या स्वागतयात्रेचा प्रारंभ कसा झाला?
ठाणे जिल्ह्यातील स्वागतयात्रेची मुहूर्तमेढ रोवण्याचा मान डोंबिवली शहराला जात असून तिथूनच या अभिनव कल्पनेची सुरुवात झाली. सण, उत्सवांचे सार्वजनिक सादरीकरण या निमित्ताने डोंबिवलीकरांनी केले आणि अन्य शहरांमध्येही अशा प्रकारच्या स्वागतयात्रा निघाव्या असा तेथील मंडळींचा आग्रह होता. डोंबिवलीतील आबासाहेब पटवारी ठाणेकरांनीही स्वागतयात्रा सुरू करावी, अशा मताचे होते. त्यातूनच श्री कौपीनेश्वर सांस्कृतिक न्यासाच्या विश्वस्त मंडळाने ठाण्यामध्ये स्वागतयात्रा सुरू करण्याचा निर्णय घेतला. स्वागतयात्रेचे सर्व नियोजन, तयारी, व्यवस्थापन शहरातील संस्थांनी मिळून करण्याचा निर्णय झाला. मात्र तरीही या स्वागतयात्रेच्या मागे एका मोठय़ा संस्थेचे आधिष्ठान असणे आवश्यक होते आणि ते आधिष्ठान श्री कौपीनेश्वर सांस्कृतिक न्यासाच्या रूपाने ठाण्यातील स्वागतयात्रेला लाभले. अरविंद गोखले, अच्युतराव वैद्य, वि. कृ. केळकर, सुधाकर वैद्य, नरेंद्र पाठक, रवींद्र प्रभुदेसाई, शशिकांत देशमुख आणि उत्तम जोशी अशा सगळ्याच विश्वस्त मंडळींनी पहिल्या स्वागतयात्रेपासून मोठय़ा उत्साहाने सहभाग नोंदवला तर आजही त्यांचा सक्रिय सहभाग कायम आहे.
* स्वागतयात्रेचा मुख्य उद्देश काय आहे?
पाश्चिमात्य मंडळींच्या सेलिब्रेशन पद्धतीची भुरळ तेथील तरुणाईला पडत असावी. त्यामुळे थर्टी फस्र्टच्या रात्री मोठा जल्लोष आपल्याकडे होतो. मात्र आपल्या नववर्षांविषयी कोणतीच माहिती नसते. आपल्या परंपरा तरुण पिढीला माहिती व्हाव्यात या उद्देशाने गुढीपाडव्याला नववर्ष स्वागतयात्रेच्या माध्यमातून आपल्या परंपरांचे सेलिब्रेशन करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. सामाजिक क्षेत्रामध्ये कार्यरत असलेल्या ठाण्यातील ५०० हून अधिक संस्थांपैकी सुमारे २०० हून अधिक संस्थांनी या स्वागतयात्रेमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतला आणि स्वागतयात्रेच्या निमित्ताने जनजागृतीची एक वेगळीच लाट निर्माण झाली आहे. स्वागतयात्रेच्या निमित्ताने सामाजिक प्रश्न, जनजागृती आणि एकत्वाच्या भावनेने वाईट प्रवृत्ती विरुद्धचा लढा अशी भावना निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातो. त्यामुळे स्वागतयात्रेमध्ये सहभागी होणे म्हणजे जुन्या परंपरेला चिकटून राहणे असे म्हणणे गैर आहे. ‘लोकशिक्षण’ हाच स्वागतयात्रेचा मुख्य उद्देश आहे.
* ठाण्याच्या स्वागतयात्रेचे नियोजन कसे केले जाते?   
स्वागतयात्रेची तयारी दोन महिन्यांपासून केली जाते. श्री कौपीनेश्वर सांस्कृतिक न्यासाच्या पुढाकाराने शहरातील संस्था आणि संस्थाप्रमुखांना आवाहन करून नियोजनाच्या बैठका पार पडतात. नववर्ष स्वागतयात्रा संचालन समितीची स्थापना करून त्यांच्या माध्यमातून स्वागतयात्रेचे नियोजन केले जाते. यंदा स्वागतयात्रा संचालन समितीमध्ये स्वागताध्यक्ष म्हणून ज्येष्ठ पत्रकार श्रीकांत नेर्लेकर, कार्याध्यक्ष म्हणून उत्तम जोशी, निमंत्रक म्हणून निशिकांत महांकाळ काम पाहणार आहेत तर सहनिमंत्रक अ‍ॅड्. मयुरेश जोशी, कार्यालयप्रमुख सुधाकर वैद्य, कोषाध्यक्ष श्रीनिवास जोशी, सहकोशाध्यक्ष अशोक गोखले यांच्या समिती माध्यमातून स्वागतयात्रेचे नियोजन केले जाणार आहे. शहरातील संस्थांचे प्रमुखही या उपक्रमांमध्ये सहभागी होणार आहेत. त्यामध्ये मुकेश सावला, नामदेव मांडगे, विद्याधर ठाणेकर, प्रा. विद्याधर वालावलकर, रवींद्र कराडकर, संजीव ब्रrो, विश्वास दामले, विनायक जोशी, अजित रानडे यांचा प्रमुख सहभाग आहे. स्वागतयात्रेच्या अशा नियोजनाची प्रक्रिया पूर्ण केली जात असली तरी प्रत्येक संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी आपले स्वत:चे काम ठरवून घेतलेले आहे.    
* यंदाच्या स्वागतयात्रेची वैशिष्टय़े काय?
यंदाच्या स्वागतयात्रेमध्ये तरुणांचा मोठा उत्साह दिसून येणार आहे. तरुणांना या उपक्रमामध्ये सहभागी करून घेण्यासाठी फेसबुक, व्हॉट्सअ‍ॅप यासारख्या सोशल माध्यमांची मदत घेतली जाणार असून त्या माध्यमातून तरुणांना स्वागतयात्रेमध्ये मोठय़ा संख्येने उतरण्यासाठी प्रोत्साहित केले जाणार आहे. त्यामुळे यंदाची स्वागतयात्रा इतर वर्षीपेक्षा अधिक तरुण असेल. स्वागतायात्रेमध्ये यंदा ढोलपथकांचा मोठा सहभाग असेल. ढोलपथकांमुळे स्वागतयात्रेचा वेग मंदावू नये यासाठी ढोलपथकांना विविध चौकांमध्ये प्रात्यक्षिके सादर करण्यासाठी जागा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. तसेच भगवती शाळेचे मैदान आणि गावदेवी मैदानावर भव्य रांगोळीचे आयोजन करण्यात येणार आहे. तसेच गुढीपाडव्याच्या पूर्वसंध्येला मासुंदा तलाव परिसरातील दिव्याची रोषणाई आणि आवाजविरहित फटाक्यांची आतषबाजीही लक्षवेधी असेल. गुढीपाडव्याच्या सकाळी श्री कौपीनेश्वराच्या पायघडय़ा आणि वाद्यांच्या गजरात स्वागतयात्रेची सुरुवात होणार आहे. पालखी, दिंडी, घोडे, रांगोळ्यांच्या पायघडय़ा आणि वाद्यांच्या गजरामध्ये हा आनंदोत्सव अधिकच देखणा होऊ शकणार आहे. एका भव्य स्वागतयात्रेचा अनुभव यंदाच्या स्वागतयात्रेच्या निमित्ताने साकारला जाणार आहे. जनजागृती करण्यासाठी सी.ए. संघटना, पर्यावरण दक्षता मंच, हिरवाई, रंगावली, विविध ज्ञाती बांधव, ठाणे महानगरपालिका वाहतूक पोलीस सगळ्यांचा सहभाग उत्साही स्वरूपाचा असणार आहे. आधुनिक विचारांचा आणि पारंपरिक सणांचा मिलाप या स्वागतयात्रेच्या निमित्ताने ठाणेकरांना नक्की अनुभवता येऊ शकणार आहे.
* यंदाच्या स्वागतयात्रेचे स्वरूप कसे असणार आहे?
श्री कौपीनेश्वर मंदिरातून निघणारी स्वागतयात्रा शहरातील विविध भागांतून फिरणार आहे. महापालिकेच्या वतीने चांगला रस्ता उपलब्ध करून देण्यात आला असल्याने इतर शहरांमध्ये रस्त्यावरील खड्डय़ांमुळे निर्माण होणारी समस्या ठाणे शहराला नाही. चांगल्या रस्त्यांवरून अत्यंत शिस्तबद्ध स्वरूपामध्ये ही स्वागतयात्रा निघू शकणार आहे. यात्रेदरम्यान शहर वाहतूक पोलिसांचे सहकार्यही लाभत असते. मुळात स्वागतयात्रा शिस्तबद्ध असल्याने त्यांनाही फारसा त्रास होत नाही. त्यामुळे यंदाची स्वागतयात्राही भव्य, देखणी आणि तितकीच शिस्तबद्धही असणार आहे.
* स्वागतयात्रेच्या माध्यमातून जनजागृतीचा उद्देश साध्य होतो का?
स्वागतयात्रा ही संकल्पनाचा पुरोगामी आहे. आपल्याकडच्या परंपरांचा उपयोग समाजातील समस्या, गैरसमज आणि वाईटाला विरोध करण्यासाठीच स्वागतयात्रा सुरू झाल्या आहेत असे म्हणायला हवे. केवळ मनोरंजन हा स्वागतयात्रेचा उद्देश नाही तर ‘लोकशिक्षण’ हाच याचा मुख्य उद्देश आहे. लोकमान्य टिळकांनी सुरू केलेल्या गणेशोत्सवाच्या आणि शिवजयंतीच्या उत्सवाइतकाच हा उत्सव महत्त्वाचा ठरत असून राष्ट्र कितीही गरीब असले तरी आपले उत्सव उत्साहात साजरे झाले पाहिजेत हा त्यांचा आग्रह होता. टिळकांनाही स्वागतयात्रेची संकल्पना आवडली असती. स्वागतयात्रेच्या माध्यमातून जनजागृती आणि लोकशिक्षणाचा मुख्य उद्देश साध्य होतो असे मी निश्चतच म्हणेन.