माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांचे मत

डोंबिवली : अर्थव्यवस्था वाढ आणि विकासाचे सर्व टप्पे आपणास गाठावयाचे असतील तर त्यासाठी आधुनिकीकरण तसेच रोजगारभिमुख धोरण यावर प्राधान्याने काम करावे लागेल. त्याचबरोबर या प्रक्रियेत प्रत्येक समाज घटकाचा सहभाग खूप मोलाचा आहे, असे मत माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांनी डोंबिवलीतील विवेकानंद सेवा मंडळातर्फे आयोजित आभासी व्याख्यानमालेत केले.

मंडळातर्फे आयोजित आभासी व्याख्यानमालेतील ‘पाच लाख कोटी डॉलर्स अर्थव्यवस्थेचे उत्तुंग लक्ष्य’ विषयावरील तिसरे पुष्प मंत्री प्रभू यांनी गुंफले. यावेळी मंडळाचे केतन बोंद्रे, अनिल मोकल उपस्थित होते.

प्रभू म्हणाले की, पाच लाख कोटी डॉलर उत्तुंग अर्थव्यवस्थेचे लक्ष्य गाठण्यासाठी आपणास रोजगारभिमुख शिक्षण, मनुष्यबळ विकास, कृषी क्षेत्र, ग्रामविकास, देशातील औद्योगिक उत्पादन क्षमता, पायाभूत सुविधा, रोजगार निर्मिती यासारख्या महत्वपूर्ण विविध आयामांवर लक्ष केंद्रित करावे लागणार आहे. उत्तुंग अर्थव्यवस्थेचे ध्येय साध्य करण्यासाठी हा पाया प्रथम भक्कम करणे आवश्यक आहे. पाच लाख कोटी डॉलर अर्थव्यवस्थेच्या उभारणीत ६० टक्के म्हणजे तीन लाख कोटी डॉलर हिस्सा हा सेवा क्षेत्रातून उभा करण्यात येणार आहे, असे प्रभू यांनी सांगितले.

सामान्य माणसाचा उत्कर्ष होण्यासाठी आर्थिक विकास महत्वाचा आहे. त्यासाठी पाच लाख कोटी डॉलर इतके सकल राष्ट्रीय उत्पन्न करणे हे मध्यम स्वरुपातील राष्ट्रीय ध्येय आपल्यासमोर आहे, हे सांगताना प्रभू यांनी पंडित दिनदयाळ उपाध्याय यांच्या अंत्योदय संकल्पनेचा दाखला दिला. सर्वसामान्य माणसाचा विकास म्हणजे देशाचा विकास ही पंडितजींची संकल्पना होती. राष्ट्र निर्मितीमध्ये देशातील प्रत्येक नागरिक, घटकाचा समावेश असला पाहिजे. त्याशिवाय हे शक्य नाही, असे ते म्हणाले.

प्रत्येक जिल्हा आर्थिक दृष्टय़ा सक्षम करण्यासाठी सहा जिल्ह्यात पथदर्शी प्रकल्प राबविण्यात आलेत, असे प्रभू यांनी सांगितले. पाच हजाराहून अधिक श्रोते या आभासी व्याख्यानात सहभागी झाले होते.