18 September 2020

News Flash

मुजोर रिक्षाचालकांचा धंदा ‘बस’ला

कल्याण शहरातील मुजोर रिक्षाचालकांचा धंदा ‘बस’वण्यासाठी प्रवाशांनी केडीएमटीच्या बसने प्रवास करून दाखवलेले एकीचे बळ एक दिवसाचेच नको तर ती कायम निर्धाराची वज्रमूठ असायला हवी,

| March 3, 2015 12:27 pm

कल्याण शहरातील मुजोर रिक्षाचालकांचा धंदा ‘बस’वण्यासाठी प्रवाशांनी केडीएमटीच्या बसने प्रवास करून दाखवलेले एकीचे बळ एक दिवसाचेच नको तर ती कायम निर्धाराची वज्रमूठ असायला हवी, अशी अपेक्षा अनेक नागरिकांनी व्यक्त केली आहे. केडीएमटीच्या बसने प्रवास करण्याच्या प्रवासी संघटनेच्या आवाहनाला कल्याणकरांनी मोठा प्रतिसाद दिला. विशेष म्हणजे, प्रवाशांना पाठबळ देण्यासाठी कल्याण डोंबिवली महापालिका परिवहन उपक्रम, वाहतूक पोलीस तसेच उप-प्रादेशिक परिवहन अधिकारीही रस्त्यावर उतरल्याचे चित्र गेल्या काही दिवसांपासून दिसत आहे. दरम्यान, केडीएमटीच्या फेऱ्या वाढविण्यासाठी नव्याने आढावा घेतला जात आहे, अशी माहिती उपक्रमातील उच्चपदस्थ सूत्रांनी दिली.
भाडे नाकारणे, वाढीव भाडे घेणे, मनमानी करून वाहनतळ सोडून रिक्षा रस्त्यावर उभी करणे असे प्रकार कल्याणमधील रिक्षा चालकांकडून मोठय़ा प्रमाणात सुरू आहेत. रिक्षा चालकांच्या या मनमानीला प्रवासी कंटाळले आहेत. रिक्षा संघटनांना राजकीय पाठबळ असल्याने मुजोर रिक्षा चालकांवर वाहतूक पोलीस, आरटीओकडून कारवाई करण्यात येत नाही, असे प्रवाशांचे म्हणणे आहे. एक दिवस रिक्षा चालकांचा हा उद्दामपणा मोडून काढला पाहिजे या उद्देशाने कल्याणमधील जागरूक नागरिक शनिवारी एकत्र आले. कल्याण प्रवासी संघटनेच्या माध्यमातून नागरिकांनी रिक्षाऐवजी बसमधून प्रवास करण्याचे आवाहन केले.
शनिवारी राबवण्यात आलेल्या या मोहिमेला नागरिकांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला. जागरूक प्रवाशांनी सुरू केलेल्या या आंदोलनाला कोणतेही राजकीय नेतृत्व नव्हते तसेच फलकबाजीही नव्हती. तरीही प्रवासी संघटित होऊ शकतात असा एक संदेश या आंदोलनामुळे गेला. प्रवासी संघटित झाले तर रिक्षा चालकांना जेरीस आणू शकतात. याचा प्रत्ययही शासकीय यंत्रणांनी घेतला. प्रवाशांनी स्वत:हून केडीएमटीच्या बसने प्रवास करण्याचा निर्णय घेऊन रिक्षाने न येण्याचा निर्णय घेतल्याने वादाचा प्रसंग उद्भवण्याची शक्यता होती. त्यामुळे कल्याण रेल्वे स्थानक भागात केडीएमटीचे महाव्यवस्थापक सुधीर राऊत, पोलीस उपायुक्त संजय जाधव, वाहतूक विभागाचे साहाय्यक पोलीस आयुक्त सयाजी डुबल, रिक्षा संघटेनेचे पदाधिकारी प्रकाश पेणकर, आरटीओ अधिकारी उपस्थित होते.  
एकत्रित बैठक घेणार
कल्याण पश्चिम रेल्वे स्थानक परिसराला फेरीवाल्यांचा विळखा पडला आहे. पदपथांवर वाहने ठेवली जात आहेत. नागरिकांना चालण्यास त्यामुळे जागा नाही. रिक्षा चालक रस्ते अडवून व्यवसाय करतात. अधिकृत रिक्षा वाहनतळावरून प्रवासी वाहतूक करणे अनेक रिक्षा चालक टाळतात. त्यामुळे रेल्वे स्थानक भागात रस्त्यावर सतत वाहतूक कोंडी असते. मुख्य रस्त्यांवर कचराकुंडय़ा असल्याने बस वाहतूक, प्रवाशांना ये-जा करणे अवघड होते. असे अनेक प्रश्न कल्याण रेल्वे स्थानक भागात आहेत. हे प्रश्न प्राधान्याने सोडवण्यासाठी पालिका, आरटीओ, वाहतूक, पोलीस आणि प्रवासी याची एकत्रित बैठक घेण्यात येईल, असे आश्वासन उपायुक्त जाधव यांनी प्रवासी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना दिले आहे.
जागृती सुरूच
कोणतेही राजकीय पाठबळ, नेतृत्व नसताना बसमधून प्रवास करण्याच्या आवाहनाला नागरिकांनी चांगला प्रतिसाद दिला. रिक्षा चालकांना विरोध म्हणून नाही, पण रिक्षा चालकांनी प्रामाणिकपणे व्यवसाय करावा, नियमित भाडय़ात प्रवासी वाहतूक करावी या उद्देशातून कल्याण प्रवासी संघटनेने प्रवासी जागृतीचे प्रयत्न सुरू राहणार आहेत. केडीएमटी प्रशासन, पोलीस उपायुक्त, वाहतूक अधिकारी यांनी प्रवाशांच्या बाजूने उभे राहून सहकार्य देण्याची तयारी दर्शवली आहे. या सर्व अधिकाऱ्यांची एकत्रित बैठक झाल्यानंतर एक समन्वय समिती स्थापन करण्यात येईल. या माध्यमातून प्रवाशांना रेल्वे स्थानक भागातून दर्जेदार बस, रिक्षा सेवा मिळेल या दृष्टीने प्रयत्न केले जातील, असे प्रवासी संघटनेचे राजेंद्र फडके यांनी सांगितले.

‘काहीतरी धडा घ्या’
रिक्षा संघटना प्रवाशांच्या विरोधात नाही. रिक्षा चालकाने प्रवाशांना तत्पर, नियमित भाडय़ात सेवा दिली पाहिजे. काही चुकार रिक्षा चालकांमुळे सर्वच रिक्षा चालक बदनाम होत आहेत. अशा चुकार चालकांवर कारवाई करण्यात यावी. त्यांना रिक्षा संघटना पाठीशी घालणार नाही. प्रवासी जागरूक झाले आहेत. त्यामुळे रिक्षा चालकांनी आपला व्यवसाय चालू राहण्यासाठी प्रवाशांशी बेशिस्त वर्तन करू नये, असे रिक्षा संघटनेचे नेते प्रकाश पेणकर यांनी सांगितले.

रिक्षा चालक फरार
कोणताही परवाना नसताना बेकायदा रिक्षा चालवणारे सुमारे दोन हजार रिक्षा चालक शनिवारी रेल्वे स्थानक परिसरातून गायब झाले होते. त्यामुळे रेल्वे स्थानक परिसर सुटसुटीत, मोकळा झाला होता. कोणताही परवाना नसलेले हे रिक्षा चालक दररोज रेल्वे स्थानक भागात अनागोंदी माजवतात हे प्रवासी आंदोलनाच्या माध्यमातून स्पष्ट झाले आहे. प्रवाशांच्या आंदोलनामुळे या भागात मोठय़ा प्रमाणावर वाहतूक पोलीस आणि आरटीओ अधिकाऱ्यांची गस्त होती. त्यामुळे कारवाईचा बडगा उगारला जाईल, या भीतीने परवाना नसलेल्या रिक्षा येथे आल्याच नाहीत. त्यामुळे प्रवाशांनी सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेला अधिक प्राधान्य दिले.

कल्याण रेल्वे स्थानक भागातून शहराच्या विविध भागांत जाण्यासाठी केडीएमटीच्या अधिकाधिक बस रेल्वे स्थानक भागातून सकाळ, संध्याकाळ सोडण्याचा प्रयत्न करण्यात येईल. प्रवासी केंद्रबिंदू ठेवून बस वाहतूक चालवली जाते. त्यामुळे प्रवाशांच्या सूचनांची दखल घेण्यात येईल
– सुधीर राऊत, महाव्यवस्थापक

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 3, 2015 12:27 pm

Web Title: commuter in kalyan boycott auto rickshaw
Next Stories
1 ठाणे शहरबात : ठाण्यापल्याड प्रभू प्रमाद!
2 आठवडय़ाची मुलाखत : उद्योगांना सतत धोपटणे बंद करा
3 वाहतुकीचा रेड सिग्नल : शहर, रस्ते, नागरिक..
Just Now!
X