प्रदूषण, कंपन्यांतील यंत्रणा, कामगारांची सुरक्षा यांकडे दुर्लक्ष

बोईसरच्या औद्योगिक कंपनीत झालेल्या स्फोटानंतर एमआयडीसीमधील औद्योगिक कंपन्यांच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. सुरक्षा सप्ताह सुरू असतानाच हा स्फोट झाल्याने सुरक्षेच्या नियमांची पायमल्ली होत असल्याचे आढळून आले आहे. या कंपन्यांतून प्रदूषणही होत असून त्यावर नोटिसा बजावूनही ते प्रमाण कमी झालेले नाही.

तारापूरच्या प्लॉट ई १०७ येथील नोबाफाईन केमिकल या कंपनीत गुरुवारी साडेअकरा वाजता रिअ‍ॅक्टरचा मोठा स्फोट झाला. काही क्षणातच आगीने रौद्ररूप धारण केले आणि या कंपनीच्या परिसरातील इतर कंपन्यांनी पेट घेतला. या आगीत नोबाफाईससन कंपनीसह युनिमॅक्स, प्राची, आरती ड्रग्ज, भारत रसायन या चार रसायनाच्या कंपन्यांनीही पेट घेतला. त्यांचे मोठे नुकसान या आगीत झाले. या दुर्घटनेत आरती ड्रग्ज या कंपनीतील तीन कामगारांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर आद्योगिक कंपन्यांच्या सुरक्षेतील त्रुटी समोर आल्या आहेत.

बोईसर तारापूर एमआयडीसी क्षेत्रात ११०० लहान मोठे रासायिक निर्मितीचे कारखाने आहेत. या औद्योगिक कंपन्यांमधून नेहमी सुरक्षेच्या नियमांचे उल्लंघन केले जात असते. अनेक कंपन्यांत अधूनमधून स्फोटाच्या घटना घडत असतात. सुरक्षेबरोबर प्रदूषणाचा मोठा प्रश्न या कंपन्यांमधून उपस्थित झाला आहे. त्यामुळेच महाराष्ट्र प्रदूषण नियामक मंडळाने ५० हून अधिक कंपन्यांना बंद करण्याच्या नोटीस बजावल्या होत्या. या कंपन्याचे पाणी आणि वीजजोडणी खंडित करण्यात आली होती. २०१६ पासून आतापर्यंत ४८ विविध कंपन्यांवर कारवाई करण्यात आलेली आहे. सुरक्षेच्या नियमांचे उल्लंघन  होत असताना रासायनिक पाणी थेट समुद्रात आणि नाल्यात सोडले जात असते. यामुळे परिसरातील शेतीवर परिणाम झालेला असून अनेक विहिरी प्रदूषित झालेल्या आहेत. एमआयडीसीची सांडपाणी वाहून नेणाऱ्या प्रकल्पाची क्षमता कमी असल्याने पाणी थेट समुद्रात जात असते. या प्रदूषित पाण्यामुळे शेतीवरही परिणाम झालेला आहे.

विशेष म्हणजे देशभरात ४ मार्च ते १० मार्च हा औद्योगिक कंपन्यांमध्ये सुरक्षा सप्ताह म्हणून साजरा केला जातो, परंतु तारापूर एमआयडीसीमध्ये या सुरक्षेच्या प्राथमिक उपाययोजनांकडे दुर्लक्ष केल्याचे दिसून आले. भारतीय मांगेल परिषदेने हरित लवादाकडे या प्रदूषणाबाबत याचिका दाखल केली होती.