05 March 2021

News Flash

आईच्या मृत्यूनंतर अनाथ मुलांना भरपाई

मंचाच्या सदस्या माधुरी विश्वरुपे, एन. डी. कदम यांच्यासमोर हे प्रकरण सुनावणीसाठी होते.

ठाणे जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचाचा आदेश; २००७ मधील दुर्घटना

घरगुती गॅस सिलींडरच्या स्फोटात मरण पावलेल्या कल्याणमधील रामवाडीतील विधवा महिलेच्या दोन्ही मुलांना गॅस आणि विमा कंपन्यांनी एकत्रितपणे १० लाख रुपयांची नुकसान भरपाई येत्या ४५ दिवसात द्यावी. तसेच ही रक्कम देण्यास टाळाटाळ केली तर दरसाल ९ टक्के व्याजाने ही रक्कम ग्राहकाला द्यावी लागेल. याशिवाय, या अनाथ मुलांना दाव्याच्या खर्चापोटी प्रतिवादींनी २५ हजार रुपये खर्च द्यावा, असे आदेश ठाणे जिल्हा ग्राहक व तक्रार निवारण मंचाच्या कार्यकारी सदस्या माधुरी विश्वरुपे आणि सदस्य एन. डी. कदम यांनी दिले आहेत.

कल्याण पश्चिमेकडील टिळक चौकातील रामवाडी येथील हरी वृंदावन सोसायटीत राहणाऱ्या भारती निमसे (३२) या ६ एप्रिल २००७ रोजी सकाळी घरातील स्वयंपाकाच्या गॅसचा सिलिंडर बदलत असताना भरलेल्या सिलिंडरमधून गॅसगळती सुरू झाली. हा गॅस अल्पावधीतच पसरला आणि देवघरातील दिव्याच्या आगीशी त्याचा संपर्क येताच आग लागली. या आगीत भारती यांचा होरपळून जागीच मृत्यू झाला होता.

रक्कम देण्यास टाळाटाळ

मंचाच्या सदस्या माधुरी विश्वरुपे, एन. डी. कदम यांच्यासमोर हे प्रकरण सुनावणीसाठी होते. गॅस कंपनीने भारती यांच्या निष्काळजीपणामुळेच ही दुर्घटना घडल्याचा दावा केला. या अपघाताची आपली जबाबदारी नसल्याचे स्पष्ट केले. विमा कंपन्यांनी मयताच्या मुलांना तात्पुरती मदत देऊन, पूर्ण रक्कम देण्यास टाळाटाळ केली. ग्राहक मंचाने तक्रारदार व प्रतिवादी यांचे म्हणणे ऐकून, सर्वोच्च न्यायालयाने दिलेले महत्वपूर्ण निवाडे यांचे दाखले देत, सिलींडर टाकीच्या तोंडाजवळील पीन तिरकी असल्याने गॅस बाहेर आला. याला गॅस पुरवठा कंपनी जबाबदार आहे, असा निष्कर्ष काढत चारही प्रतिवादींनी तक्रारदारांना १० लाख रुपये नुकसान भरपाई १३ फेब्रुवारी २०१६ पर्यंत द्यावी, असा आदेश दिला आहे.  खर्चापोटी तक्रारदारांना २५ हजार रुपये देण्याचे आदेश दिले.

२० लाख रुपये नुकसान भरपाई देण्याची मागणी

भारती निमसे या विधवा होत्या. पती हयात नसल्याने भारती कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी खाणावळ चालवित होत्या. या कामात त्यांना त्यांची आई शांताबाई भांगडे सहकार्य करीत असत. मात्र या दोघींच्या निधनामुळे भारती यांची वर्षां (१६) आणि नीलेश (१३, त्यावेळचे वय) ही दोन्ही मुले अनाथ झाली. उत्पन्नाचे साधन नसल्याने पालनपोषण कसे करायचे, असा प्रश्न या मुलांसमोर उभा राहिला. जाणकारांचे मार्गदर्शन घेऊन वर्षां व नीलेश निमसे यांनी ‘हिंदुस्थान पेट्रोलियम कापरेरेशन’, ‘बजाज अलायन्झ’, ‘मे. इंद्रदीप एजन्सी’ आणि ‘न्यू इन्शुरन्स कंपनी’ विरोधात दावा ठोकला होता. या चारही प्रतिवादींनी २० लाख रुपये नुकसान भरपाई देण्याची मागणी दाव्यात केली होती.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 2, 2016 1:52 am

Web Title: compensation orphaned children after the death of his mother
Next Stories
1 राष्ट्रीय बाल विज्ञान परिषदेत ठाण्याचे यश
2 गुरुवर्य दत्तात्रय मेहेंदळे यांचा ठाण्यात गौरव सोहळा
3 गोविंदवाडी रस्त्याच्या मार्गातील अनधिकृत बांधकामे जमीनदोस्त
Just Now!
X