भाईंदर : परिसरात सतत कचरा साचत असल्याचा जाब विचारणाऱ्या दाम्पत्याला नगरसेवकाच्या समर्थकाकडून मारहाण करण्यात आल्याची घटना भाईंदर पूर्व येथील गीतानगर येथे घडली आहे, विशेष म्हणजे या मारहाणीची तक्रार करण्यासाठी हे दाम्पत्य पोलीस ठाण्यात गेले असता पोलिसांकडून दाम्पत्याला मारहाण तसेच अपशब्द वापरण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. याप्रकरणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे कार्याध्यक्ष मुझफ्फर हुसेन यांनी दोषी पोलीस अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

भाईंदर पूर्वच्या गीतानगर  फेस -८ परिसरातील गीता सरोवर सोसायटीमध्ये राहणाऱ्या धीरज शर्मा आणि त्यांची पत्नी किरण शर्मा यांनी  नगरसेवक नरेश पाटील यांना साठत असलेल्या कचऱ्याबाबत विचारणा केली असता नरेश पाटील समर्थक राजू गौड या व्यक्तीने धीरज शर्माना मारहाण करण्यास सुरुवात केली. या मारहाणीची तक्रार करण्यास पती- पत्नी नवघर  पोलीस ठाण्यात गेले असता  पोलिसांनी उलट तक्रारदारास मारहाण करून  त्यांच्या पत्नीला अपशब्द वापरल्याचा तसेच आपली तक्रार घेण्यात पोलिसांनी  ६ तासांचा  कालावधी  लावला  असा आरोप धीरज शर्मा यांनी केला आहे. या घटनेची माहिती मुजफर हुसेन यांना  मिळाल्यानंतर त्यांनी भाईंदरचे उपविभागीय अधिकारी शांताराम वळवी यांची भेट घेतली.  एखादा अधिकारी दोषी असल्याचे आढळल्यास त्यावर निश्चित कडक कारवाई केली जाईल, असे आश्वासन  वळवी यांनी दिले.