लोकसत्ता खास प्रतिनिधी

ठाणे : अन्य आजारांच्या रुग्णांवर उपचारास टाळाटाळ केल्याप्रकरणी मुंब्य्रातील बिलाल, प्राईप क्रिटीकेयर आणि युनिव्हर्सल या तीन खासगी रुग्णालयांविरोधात महापालिका प्रशासनाने गुन्हा दाखल केला आहे. या तिन्ही ठिकाणी ४१ रुग्ण उपचार घेत आहेत. या रुग्णांवर ज्या ठिकाणी उपचार सुरू आहेत, तो परिसर वगळून अन्य भाग महापालिकेने सील केला आहे. तसेच ही रुग्णालये ताब्यात घेण्यात येणार असल्याच्या नोटिसाही पालिकेने बजावल्या आहेत.

शहरातील काही मोठी खासगी रुग्णालये पालिकेने ताब्यात घेऊन ती करोनाबाधित रुग्णांच्या उपचारासाठी राखीव केली आहेत. तर उर्वरित खासगी रुग्णालये करोनाबाधित रुग्णांव्यतिरिक्त अन्य आजारांच्या रुग्णांसाठी राखीव ठेवली आहेत. असे असले तरी अन्य आजारांच्या रुग्णांना खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करून घेण्यास टाळाटाळ केली जात असल्याच्या तक्रारी गेल्या काही महिन्यांपासून पुढे येत आहेत. असाच प्रकार आता मुंब्य्रात उघडकीस आला असून याप्रकरणी मुंब्य्रातील बिलाल, प्राईप क्रिटीकेयर आणि युनिव्हर्सल या तीन खासगी रुग्णालयांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रुग्णालयात जागा शिल्लक असतानाही रुग्णांना उपचारासाठी दाखल करून घेतले जात नव्हते तसेच आजारी रुग्णांना किंवा महिलांना प्रसूतीसाठी दाखल करताना भरमसाट पैसे भरण्यास सांगितले जात होते,  अशा स्वरूपाच्या तक्रारी महापालिकेकडे प्राप्त झाल्या होत्या. याबाबत महापालिका प्रशासनाने संबंधित रुग्णालयांना नोटीस बजावून रुग्णांना उपचारासाठी दाखल करून घेण्याच्या सूचना केल्या होत्या. मात्र, त्यानंतरही या रुग्णालयांविषयी महापालिकेकडे पुन्हा तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. गेल्या दोन दिवसांत प्राप्त झालेल्या तक्रारीच्या महापालिकेने पडताळणी केली होती. त्यात तथ्य आढळल्यानंतर आयुक्त विजय सिंघल यांनी तिन्ही रुग्णालये सील करून त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार मुंब्रा प्रभाग समितीचे साहाय्यक आयुक्त महेश आहेर यांनी मुंब्रा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

या तिन्ही रुग्णालयांमध्ये ज्या ठिकाणी रुग्ण दाखल आहेत, तो परिसर वगळून अन्य परिसर सील करण्यात आला आहे. बिलालमध्ये २५, प्राईप क्रिटीकेयरमध्ये १४ आणि युनिव्हर्सलमध्ये २ असे एकूण ४१ रुग्ण उपचार घेत असून त्यांच्यावर आता तिथेच उपचार सुरू ठेवण्यात आले आहेत. तसेच बिलाल रुग्णालयाची क्षमताच २५ खाटांची असल्यामुळे हे रुग्णालय सील करण्यात आले नाही.

-महेश आहेर, साहाय्यक आयुक्त