News Flash

रिक्षाचालकांच्या मनमानीबाबत संताप

डोंबवली येथे पोलीस संवाद कार्यक्रमात ज्येष्ठ नागरिकांकडून तक्रारींचा पाढा

डोंबवली येथे पोलीस संवाद कार्यक्रमात ज्येष्ठ नागरिकांकडून तक्रारींचा पाढा

डोंबिवली : डोंबिवली पूर्व, पश्चिम रेल्वे स्थानक परिसरात व्यवसाय करीत असलेले रिक्षाचालक ज्येष्ठ नागरिकांना अवाच्या सवा भाडे आकारतात. अनेकदा भाडे नाकारतात किंवा अर्ध्या रस्त्यात उतरण्यास भाग पाडतात. रिक्षाचालकांची ही मनमानी आरटीओ, वाहतूक, पोलिसांनी एकत्रितपणे मोडून काढावी अशी एकमुखी मागणी ज्येष्ठ नागरिकांनी पोलीस संवाद कार्यक्रमात केली.

रामनगर पोलीस ठाण्यातर्फे ठाकूर सभागृहात सोमवारी सकाळी ज्येष्ठ नागरिक संवाद कार्यक्रम आयोजित केला होता. यावेळी अतिरिक्त पोलीस आयुक्त दत्तात्रय कराळे, पोलीस उपायुक्त विवेक पानसरे, ज्येष्ठ नागरिक महासंघाचे माजी अध्यक्ष रमेश पारखे, साहाय्यक पोलीस आयुक्त दिलीप राऊत, अनिल पोवार, वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेश अहिर उपस्थित होते. वाढती गुन्हेगारी, पायी जात असताना घ्यावयाची काळजी याविषयी रामनगर पोलिसांनी शहरातील ज्येष्ठ नागरिकांशी सुसंवादाचा कार्यक्रम आयोजित केला होता. यावेळी रिक्षाचालकांच्या मनमानीचा पाढा ज्येष्ठ नागरिकांनी वाचला.

अनेक रिक्षाचालक गणवेशात नसतात. भरधाव वेगाने रिक्षा चालवितात. त्यांना विचारणा केली तर एकेरी उच्चार करून ज्येष्ठ नागरिकांचा अवमान करतात, अशा तक्रारी यावेळी उपस्थित ज्येष्ठ नागरिकांनी केल्या. पोलीस ठाण्यात तक्रार करण्यासाठी आलेल्या ज्येष्ठ नागरिकाला पोलीस तक्रार करू नका असा सल्ला देतात. तसेच गंभीर घटना असूनही अदखलपात्र गुन्हा नोंदवून त्यांची बोळवण करतात, अशा तक्रारी यावेळी करण्यात आल्या.

प्रत्येक नागरिकाने आपली जबाबदारी ओळखून आचरण केले तर प्रत्येक गोष्टीसाठी पोलिसांना धावाधाव करावी लागणार नाही. शहरात ज्येष्ठ नागरिक सुरक्षित आहेत. कायदा मोठा आहे. तो प्रत्येक नागरिकाला समजला पाहिजे, असे ज्येष्ठ नागरिक महासंघाचे माजी अध्यक्ष रमेश पारखे यांनी सांगितले.

ज्येष्ठांना तात्काळ साहाय्य

पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करून घेण्यास कोणी हवालदार नकार देत असेल तर त्याची तक्रार तात्काळ वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे करा. वरिष्ठांच्या भ्रमणध्वनीवर ही माहिती कळविल्यास ज्येष्ठांना तात्काळ साहाय्य करणे शक्य होईल. ज्येष्ठ नागरिकांनी रस्त्याने जाताना कोणालाही आपली ओळख देऊ नये. किमती ऐवज सोबत ठेऊ नये, असे आवाहन अतिरिक्त पोलीस आयुक्त दत्तात्रय कराळे यांनी ज्येष्ठ नागरिकांना केले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 11, 2019 2:47 am

Web Title: complaints against rickshaw drivers from senior citizens in dombivali zws 70
Next Stories
1 वसईत नाताळ गोठय़ांची जोरदार तयारी
2 नालासोपारा वसतिगृहातील मुलीच्या आत्महत्येचे गूढ कायम
3 वादग्रस्त जाहिरात ठेक्यास स्थगिती
Just Now!
X