शिवसेनेचे युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी मंगळवारी कल्याण-डोंबिवली शहरांना भेट देऊन तेथील रस्त्यांच्या सिमेंट काँक्रीटीकरणाच्या कामांची पाहणी केली. वारंवार होणाऱ्या दौऱ्यानंतरही ही कामे मंदगतीने सुरू असल्याचा मुद्दा त्यांच्यापुढे काही पदाधिकाऱ्यांनी मांडण्याचा प्रयत्न केला, मात्र पुढील १५-२० वर्षे रस्ते खोदण्याची वेळ येऊ नये म्हणून ही कामे दर्जेदार व्हायला हवीत, अशी भूमिका त्यांनी या वेळी मांडली.  पावसाळ्यापूर्वी ही कामे पूर्ण व्हायला हवीत, अशा सूचनाही त्यांनी केल्या.
डोंबिवली पूर्वेतील गांधीनगर, महावीर नगर, चार रस्ता, फडके रोड तसेच पश्चिमेतील कोपर रोड येथील रस्त्यांच्या कामांची पाहणी आदित्य यांनी केली. या वेळी त्यांच्यासोबत पालकमंत्री एकनाथ शिंदे, महापौर कल्याणी पाटील, शिवसेनेचे कल्याण जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे, कैलास शिंदे, रमेश म्हात्रे, रवी पाटील, दीपेश म्हात्रे, भाऊ चौधरी, सदानंद थरवळ आदी उपस्थित होते.  
या दौऱ्यानंतर आदित्य यांनी पत्रकारांशी संवाद साधला. कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या निवडणुका तोंडावर आल्या असल्या तरी या पाहणी दौऱ्याचा निवडणुकीशी काहीही संबंध नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. यापूर्वी मी कल्याण-डोंबिवली शहरात दोन दौरे केले आहेत. रस्त्यांची कामे योग्य पद्धतीने होणे गरजेचे आहे. जेणेकरून पुढील १५-२० वर्षे हे रस्ते खोदण्याची वेळ येऊ नये. रस्त्यांची कामे पावसाळ्यापूर्वी होणे गरजेचे आहे. त्यामुळे येत्या ३१ मे पर्यंत ही कामे मार्गी लावा, अशा सूचना आपण स्थानिक नेत्यांना केल्या आहेत, असेही आदित्य यांनी स्पष्ट केले.   

ग्रंथालयाची पाहणी राहिलीच.!
फडके रोड येथील रस्त्याच्या कामाची पाहणी केल्यानंतर टिळक रोडवरील ग्रंथालयाची पाहणी आदित्य करणार होते. मात्र त्यांनी ती न करताच कल्याण येथील काळा तलाव येथील बाळासाहेबांच्या स्मारकाची पाहणी करण्यास ते रवाना झाले.

रस्त्यांची कामे पूर्ण करताना वाहतूक, जलवाहिन्या, वीजवाहिन्या यांसारख्या तांत्रिक मुद्दय़ांचा सातत्याने अडथळा येतो आहे. त्यामुळे काही ठिकाणी कामे पूर्ण करण्यास विलंब लागत आहे. मात्र ती लवकरच पूर्ण होतील.          
आदित्य ठाकरे</strong>