28 January 2021

News Flash

३५ गृहनिर्माण संस्थांच्या आवारात कचऱ्यापासून खतनिर्मिती

कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या शून्य कचरा मोहिमेचे फलित

कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या शून्य कचरा मोहिमेचे फलित

भगवान मंडलिक, लोकसत्ता

कल्याण: कल्याण-डोंबिवली शहरे कचरामुक्त करण्यासाठी आणि पालिकेच्या शून्य कचरा मोहिमेंतर्गत दोन्ही शहरातील ३५ गृहनिर्माण सोसायटय़ांनी आवरातच कचऱ्यापासून खतनिर्मितीचे प्रकल्प उभारले आहेत. यापैकी १५ सोसायटय़ांमधील कचऱ्यापासून खतनिर्मितीचे प्रकल्प सुरू झाले आहेत. तर, उर्वरित सोसायटय़ांमधील प्रकल्प येत्या आठवडाभरात सुरू करण्यात येणार आहेत.

दररोज शंभर किलोपेक्षा अधिक कचरा निर्माण करणाऱ्या सोसायटय़ांनी आवँरातच कचरा विल्हेवाट प्रकल्प उभारावेत, असे आदेश कल्याण-डोंबिवली पालिका प्रशासनाने दिले आहेत. या आदेशांकडे दुर्लक्ष करणाऱ्या सोसायटय़ांचा कचरा न उचलण्याचा आणि दोन ते पाच हजार रुपये दंड आकारण्याचा इशारा पालिकेने दिला होता. त्यानुसार शहरांतील काही गृहनिर्माण संस्था आता कचरा विल्हेवाटीसाठी पुढाकार घेत आहेत.

डोंबिवलीत पाथर्लीमधील सर्वोदय गृहनिर्माण सोसायटय़ांच्या आवारात १० सोसायटय़ांनी कचऱ्यापासून खत निर्मिती प्रकल्प सुरू केला आहे. या ठिकाणी सध्या ५०० ते ६०० किलो कचऱ्यावर प्रक्रिया केली जात आहे. तयार होणारे खत सोसायटी आवारातील झाडांना देणे किंवा ते खरेदी करुन शेतकऱ्यांना अल्प दरात विकण्याचा विचार आहे, असे घोडेकर यांनी सांगितले. सर्वोदय सोसायटीत खत प्रकल्प उभारणीसाठी श्रीरंग वैद्य, प्रकाश महाडिक, विवेक सावंत अशा अनेक सदस्यांनी सहकार्य केले. अशाच प्रकारचे प्रकल्प डोंबिवली शहराच्या विविध भागात आणि कल्याणमधील खडकपाडा, बारावे, गंधारे भागात सुरू केले जात आहेत. जी सोसायटी स्वत:हून असे प्रकल्प उभा करण्याची तयारी दर्शविते त्यांना पालिका स्वत:हून सर्व प्रकारचे विनामूल्य मार्गदर्शन करते, असे उपायुक्त रामदास कोकरे यांनी सांगितले.

 

असे प्रकल्प राबविण्यापूर्वी अनेक सोसायटी सदस्य याचा आम्हाला काय फायदा असे प्रश्न उपस्थित करतात. हा प्रकल्प राबविल्यामुळे सोसायटीत खत निर्मिती सुरु होते. आवारातील झाडांना खत मिळून फळ, फुले मिळतात. प्रत्येक सोसायटी सदस्याला मालमत्ता करात पालिका पाच टक्के सूट देते.  त्यामुळे अधिकाधिक सोसायटय़ांनी या उपक्रमात सहभागी व्हावे.

रामदास कोकरे, उपायुक्त, घनकचरा विभाग

घराघरातून ओला-सुका कचरा वेगळा कसा येईल यावर सर्वाधिक भर दिला जात आहे. वर्षांनुवर्ष कचरा ही टाकाऊ वस्तू अशी मानसिकता रहिवाशांची झाली आहे. त्यामुळे कचरा हे एक धन आहे हे पटवून देण्याचे प्रयत्न प्रत्यक्ष कचरा प्रकल्पाच्या माध्यमातून सुरू केले आहेत. या उपक्रमाला रहिवाशांचा चांगला प्रतिसाद मिळतो.

विजय घोडेकर, खत निर्मिती सल्लागार

खत निर्मित प्रकल्प

सोसायटीच्या आवारात मोकळ्या जागेत हवा खेळती राहिल अशा पध्दतीच्या  दोन फॅब्रिकेटेड पेटय़ा बसविल्या जातात. एका पेटीत दररोज तयार होणारा ओला कचरा टाकून त्यावर विरजण टाकले जाते. अशाप्रकारे ओल्या कचऱ्याचे थर तयार होत गेले की हळूहळू कचरा पेटीत कचरा विघटनाची प्रक्रिया सुरू होते. ती पेटी काही दिवस बंद ठेवली जाते. तोपर्यंत दुसरी पेटी कचऱ्याने भरण्याची प्रक्रिया सुरू केली जाते. पहिल्या पेटीत २५ दिवसापर्यंत वस्त्रगाळ सेंद्रिय खत तयार होते. ही प्रक्रिया होत असताना कोणत्याही प्रकारची दुर्गंधी पसरत नाही, असे घोडेकर यांनी सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 14, 2021 2:26 am

Web Title: composting from waste in 35 housing societies premises zws 70
Next Stories
1 शनिवार, रविवार रात्री कोपरी पुलावरील वाहतूक बंद
2 बर्ड फ्लूची अफवा पसरविल्यास कारवाई
3 शुल्कासाठी शाळांचा दबाव
Just Now!
X