शुद्धीकरणासाठी विस्तृत विकास आराखडा तयार करणार; नगरविकास मंत्र्यांची घोषणा

डोंबिवली : कारखान्यांतून सोडण्यात येणारे रासायनिक पाणी, नागरिकांकडून टाकण्यात येणार कचरा तसेच सांडपाण्याचा निचरा यांमुळे दिवसेंदिवस अधिकाधिक प्रदूषित होत चाललेल्या उल्हास आणि वालधुनी या नद्यांचा लवकरच कायापालट होण्याची चिन्हे आहेत. या दोन्ही नद्यांच्या शुद्धीकरणासाठी राज्य सरकार विशेष मोहीम हाती घेईल, अशी महत्त्वपूर्ण घोषणा राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी गुरुवारी कल्याण येथे केली.

कल्याण शहरातील फडके मैदानात महाराष्ट्र चेंबर ऑफ हाऊसिंग इंडस्ट्रीच्या कल्याण-डोंबिवली युनिटतर्फे मालमत्ता प्रदर्शन भरविण्यात आले असून त्याचे उद्घाटन राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते गुरुवारी झाले. या कार्यक्रमात बोलताना शिंदे यांनी उल्हास आणि वालधुनी या दोन्ही नद्यांचे

महत्त्व अधोरेखित केले. या दोन्ही नद्यांचे शुद्धीकरण करण्यासाठी राज्य सरकार विशेष मोहीम हाती घेणार असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच या दोन्ही नद्यांचा विस्तृत विकास आरखडा तयार करण्याच्या सूचना राज्याच्या पर्यावरण आणि नगरविकास विभागाला दिल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. या नद्यांचे शुद्धीकरण करण्यात येणार असून यामुळे नद्यांमधून मुबलक पाणी जिल्ह्य़ातील नागरिकांना पिण्यासाठी उपलब्ध होईल, असेही त्यांनी सांगितले.

उल्हास, वालधुनी या नद्यांमधून कल्याण, डोंबिवली, अंबरनाथ, उल्हासनगर, बदलापूर शहरांना पिण्याच्या पाण्याचा पुरवठा होतो. गेल्या वर्षांत या शहराचे मोठय़ा प्रमाणात नागरीकरण झाले असून या भागातील सांडपाणी नद्यांमध्ये सोडण्यात येत आहे. त्यामुळे दोन्ही नद्या प्रदूषित झाल्या असून याबाबत पर्यावरणप्रेमीकडून सातत्याने ओरड होत आहे. तसेच नदी प्रदूषणाबाबत हरित लवादाने स्थानिक स्वराज्य संस्थांना वेळोवेळी नोटिसा बजावल्या असून त्याचबरोबर त्यांच्यावर दंडात्मक कारवाईही केली आहे. तसेच नद्यांचे प्रदूषण रोखण्यात स्थानिक स्वराज्य संस्थांना फारसे यश आलेले नसल्याचे चित्र आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने केलेल्या या घोषणेला महत्त्व आले आहे.

महापालिकेचे प्रकल्पही मार्गी लावा

कल्याण शहरातून जाणाऱ्या वालधुनी नदीवर पूल उभारणीचे काम सुरू असून हे काम लवकर पूर्ण केले तर शहरातील वाहतूक कोंडीची समस्या कमी होईल. त्यामुळे या पुलाचे काम लवकर पूर्ण करा, अशा सूचना नगरविकास मंत्री शिंदे यांनी महापालिका आयुक्त गोविंद बोडके यांना दिल्या. तसेच स्मार्ट सिटी प्रकल्पाची कामेही लवकरात लवकर पूर्ण करण्याच्या सूचनाही त्यांनी यावेळी केल्या. तसेच महापालिकेची शासनस्तरावर प्रलंबित असलेली कामे पूर्ण करण्यासाठी योग्य ते सहकार्य केले जाईल, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.