ठाण्यातील नव्या वसाहतींमध्ये ‘चार्जिग स्थानक’ बंधनकारक

पेट्रोल, डिझेलसारख्या इंधनावर चालणाऱ्या वाहनांमुळे होणारे प्रदूषण आणि इंधनाची कमतरता यांना पर्याय म्हणून विजेवर चालणारी वाहने आता बाजारात उपलब्ध होऊ लागली असली तरी अशा वाहनांच्या वापरातील सर्वात मुख्य अडसर त्यांच्या ‘चार्जिग’चा असतो. हीच बाब अधोरेखित करीत ठाणे महापालिकेने पालिका हद्दीत उभारण्यात येणाऱ्या विशेष नागरी वसाहतींना परवानगी देताना त्या ठिकाणी विद्युत वाहनांना (इलेक्ट्रिक कार) चार्जिग करण्यासाठी स्वतंत्र केंद्राची जागा आरक्षित करण्याची सक्ती करण्याचे ठरवले आहे.

इंधनावर धावणाऱ्या वाहनांची संख्या दिवसागणिक वाढू लागल्याने शहरात वाहतूक कोंडी तर होतच आहे, शिवाय प्रदूषणाचे प्रमाणही वाढत असल्याचा निष्कर्ष पालिकेच्या पर्यावरण विभागाच्या अहवालात काढण्यात आला आहे. याला पर्याय म्हणून  येत्या काळात विजेवर धावणाऱ्या वाहन वापराला प्रोत्साहन देण्यासाठी पावले उचलायला हवीत, असे महापालिका प्रशासनाला वाटू लागले आहे. यासाठीच विकास नियंत्रण नियमावलीत बदल करण्याचा विचार सध्या प्रशासकीय पातळीवर सुरू आहे.

विजेवर धावणारी वाहने खरेदीवर केंद्र आणि राज्य सरकारमार्फत मोठय़ा प्रमाणावर आर्थिक सवलती दिल्या जात असल्या तरी ही वाहने इंधनभारित (चार्ज) करण्यासाठी पुरेशी व्यवस्था उपलब्ध नसल्याने ग्राहकांचा अशा वाहन खरेदीकडे फारसा कल नसतो. ठाण्यासारख्या शहरात घरापासून रेल्वे स्थानकाच्या दिशेने जाण्यासाठी मोठय़ा प्रमाणावर दुचाकी वाहने वापरण्याकडे प्रवाशांचा भर दिसून येतो. त्यामुळे विजेवर चालणाऱ्या दुचाकींचा वापर वाढावा, यासाठी पालिकेने ठिकठिकाणी चार्जिग स्थानके उभारण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचबरोबर शहरात नव्याने उभ्या राहत असलेल्या विशेष नागरी वसाहतींना (टाऊनशिप) परवानगी देताना विद्युत वाहनांसाठी चार्जिग स्थानकांसाठी जागा आरक्षित करण्याचा विचार पालिका प्रशासनाने सुरू केला आहे.

‘चार्जिग’साठी सवलत

* विद्युत वाहनांचा वापर वाढवण्यासंदर्भात पालिकेमार्फत नागरी संशोधन केंद्र येथे एक विशेष बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला पालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसह महावितरण, आंतरराष्ट्रीय वित्तीय संस्था आणि इलेक्ट्रिक वाहन उत्पादक कंपन्यांचे अधिकारी उपस्थित होते.

* या बैठकीत आंतरराष्ट्रीय वित्तीय संस्थेच्या वतीने ‘डेलॉइट’ कंपनीने तयार केलेल्या अहवालावर चर्चा करण्यात आली. यात शहरात विविध ठिकाणी चार्जिग स्थानके उभारण्यासोबत या प्रकल्पाच्या तांत्रिक तसेच कायदेविषयक बाबींवर चर्चा करण्यात आली.

* या वेळी आयुक्त जयस्वाल यांनी विद्युत वाहनांचा वापर वाढावा, यासाठी पहिल्या वर्षी चार्जिगवर १०० टक्के सवलत, दुसऱ्या वर्षी ५० टक्के व तिसऱ्या वर्षी २५ टक्के सवलत देण्याबाबत विचाार करण्यात येईल, असे सांगितले.

*  यासंबंधीचा प्रकल्प येत्या ऑक्टोबर महिन्यापर्यंत कार्यान्वित करण्याचे प्रयत्न सुरू आहेत, अशी माहिती विद्युत विभागाचे प्रमुख अभियंता सुनील पोटे यांनी सांगितले.

विजेवर चालणाऱ्या वाहनांच्या चार्जिग स्थानकांच्या उभारणीसाठी चाचपणी सुरू करण्यात आली असून असे झाल्यास इंधनविरहित वाहने वापरण्याकडे ग्राहकांचा ओढा वाढू शकेल आणि प्रदूषणाची पातळी कमी होईल.

– संजीव जयस्वाल, ठाणे महापालिका आयुक्त