महापालिकेकडूनच आता निर्मिती प्रकल्पाची उभारणी; २४ तासांत २० टन प्राणवायूची निर्मिती

ठाणे : शहरामध्ये दररोज सरासरी १५०० नव्या रुग्णांची भर पडत असल्यामुळे पालिका तसेच खासगी करोना रुग्णालयांमध्ये प्राणवायूचा तुटवडा निर्माण होऊ लागला असून यामुळे रुग्णांच्या जिवावर बेतू लागले आहे. या पार्श्वभूमीवर शहरात प्राणवायू निर्मितीचा प्रकल्प उभारण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला असून यासंबंधीच्या प्रस्तावास स्थायी समितीने शुक्रवारी मान्यता दिली. १५ दिवसांत हा प्रकल्प उभारला जाणार असून त्यातून २४ तासांत २० टन प्राणवायूची निर्मिती होणार आहे.

ठाणे महापालिका क्षेत्रामध्ये गेल्या दीड महिन्यांपासून करोना रुग्णसंख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. त्यातच पालिका आणि खासगी रुग्णालयांमध्ये प्राणवायुचा तुटवडा जाणवू लागला आहे. प्राणवायू पुरवठ्याअभावी पालिकेचे पार्किंग प्लाझा आणि व्होल्टास रुग्णालय बंद आहेत. ही दोन्ही रुग्णालये सुरू झाली तर, २३०० खाटा रुग्ण उपचारासाठी उपलब्ध होणार आहेत. तसेच ग्लोबल रुग्णालयावरील रुग्णांचा भार कमी होईल. प्राणवायूच्या तुटवड्यामुळे रुग्णांना उपचारासाठी खाटा उपलब्ध होत नसून यामुळे त्यांच्या जिवावर बेतण्याची भीती व्यक्त होत आहे. तसेच येत्या काही दिवसांत प्राणवायू तुटवड्याची समस्या आणखी गंभीर होण्याची भीती आहे. या पार्श्वभूमीवर महापालिका प्रशासनाने आता स्वत:चा प्राणवायू निर्मितीचा प्रकल्प उभारण्याचा निर्णय घेतला असून यासंबंधीचा प्रस्ताव प्रशासनाने शुक्रवारी झालेल्या स्थायी समितीपुढे मंजुरीसाठी ठेवला होता. या प्रकल्पास स्थायी समितीने मान्यता दिल्याने प्रकल्प उभारणीचा मार्ग मोकळा झाला आहे. करोना काळ संपल्यानंतरही हा प्रकल्प सुरूच राहणार आहे.

औरंगाबादच्या आयरॉक्स टेक्नॉलॉजिज या कंपनीला हे काम देण्यात आले आहे. या कंपनीने यापूर्वी नंदुरबार जिल्हा परिषद, मुंबई महापालिका, सामान्य रूग्णालय, सिंधुदूर्ग, बीड याठिकाणी असे प्रकल्प उभारले आहेत. पीएसए तंत्रज्ञानावर आधारित हा प्रकल्प असून त्यातून १७५ सिलिंडर म्हणजेच २४ तासांत २० टन प्राणवायुची निर्मिती केली जाणार आहे. त्यासाठी महापालिकेला ३ कोटी २० लाख रुपये खर्च करणार आहे.

ग्लोबल रुग्णालयासाठी २० टन तर पार्किंग प्लाझासाठी १३ टन अशी दोन्ही रुग्णालयांसाठी एकूण ३३ टन प्राणवायूची गरज आहे. सद्यस्थितीत याठिकाणी प्राणवायुचा पुरेसा पुरवठा होत नाही. महापालिकेच्या प्रकल्पातून २० टन प्राणवायू साठा उपलब्ध झाला तर, येथील प्राणवायूची चिंता मिटण्याची चिन्हे आहेत.

प्रकल्प उभारणीचे कारण…

ठाणे महापालिकेच्या ग्लोबल रुग्णालयामध्ये ११ एप्रिल रोजी रात्री प्राणवायू साठा संपत आला होता. त्यावेळेस जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे, महापौर नरेश म्हस्के आणि ठाणे महापालिका प्रशासनाने प्रयत्न करून रायगड येथून १५ टन प्राणवायूचा साठा मिळविला होता. त्यामुळे या रुग्णालयातील ५५० रुग्णांचे प्राण वाचले होते. अशीच भयानक परिस्थिती संपूर्ण जिल्ह्यात आहे. त्यामुळे प्राणवायू निर्मितीचा प्रकल्प उभारण्याचा निर्णय घेतल्याचे प्रशासनाने प्रस्तावात म्हटले आहे.

औरंगाबादच्या कंपनीला काम

ठाणे महापालिकेच्या ग्लोबल आणि पार्किंग प्लाझा या दोन रुग्णालयांजवळ प्राणवायू निर्मितीचा प्रकल्प उभारला जाणार असून या दोन्ही प्रकल्पांतून २४ तासांत २० टन प्राणवायू निर्माण होणार आहे.

या प्रकल्पाचे काम औरंगाबादच्या एका कंपनीला देण्यात आले असून येत्या ३० एप्रिलपर्यंत हे काम पूर्ण करण्याची मुदत कंपनीला देण्यात आली आहे, अशी माहिती स्थायी समिती सभापती संजय भोईर यांनी दिली.