महत्त्वाच्या रस्त्यांचे डांबरीकरण न करण्याचा निर्णय

ठाणे शहरातील डांबरी रस्त्यांवर पावसाळय़ात खड्डे पडत असल्यामुळे महापालिका प्रशासनाची डोकेदुखी वाढू लागल्याने यावर कायमस्वरूपी तोडगा म्हणून यापुढे शहरातील सर्व रस्ते सिमेंट काँक्रीट किंवा ‘यूटीडब्ल्यूटी’ तंत्रज्ञानाने बनवण्याचे आदेश पालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी शुक्रवारी दिले. या संदर्भात ठोस धोरण आखण्यात येणार असून जास्त वर्दळीच्या तसेच महत्त्वाच्या रस्त्यांचे काँक्रीटीकरण करण्याचे पालिकेने निश्चित केले आहे.

ठाणे महापालिका क्षेत्रात एकूण ३५६ किमी लांबीचे रस्ते आहेत. त्यापैकी २४६ किमी लांबीचे रस्ते डांबरी असून उर्वरित ११० किमी रस्त्यांचेच काँक्रीटीकरण करण्यात आले आहे. याखेरीज शहरात ५२ किमी लांबीचे १०९ रस्ते प्रस्तावित असून येत्या वर्षभरात ते पूर्ण करण्याचे पालिकेने ठरवले आहे. हे करताना या रस्त्यांची पावसाळय़ात दुर्दशा होऊ नये, यासाठी पालिकेने हालचाली सुरू केल्या आहेत.

पावसाळय़ात रस्त्यांवरील डांबर वाहून जाते व खड्डे तयार होतात. शहरातील जवळपास ६६ टक्के रस्ते डांबरी असल्यामुळे ठाण्यातील रस्त्यांवरील खड्डय़ांचे प्रमाणही अधिक आहे. या खड्डय़ांवरून नागरिक पालिकेच्या नावाने खडे फोडू लागले आहेत. या पार्श्वभूमीवर रस्त्यांच्या कामाचा तसेच अन्य कामांचा आढावा घेण्यासाठी आयुक्त जयस्वाल यांनी शुक्रवारी महापालिकेत विभागप्रमुखांची बैठक घेतली. या बैठकीत रस्त्यांवर खड्डे पडून नयेत म्हणून यापुढे सिमेंटकाँक्रीट किंवा यूटीडब्ल्यूटीचे रस्ते बनविण्याचा निर्णय आयुक्त जयस्वाल यांनी घेतला आहे.

रस्ते दीर्घकाळ टिकावेत आणि नागरिकांचा खड्डेमुक्त प्रवास व्हावा यासाठी सर्व नवीन आणि जोडरस्ते यापुढे सिमेंट किंवा यूटीडब्ल्यूटीमध्ये बनविण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय आयुक्त जयस्वाल यांनी घेतला आहे. तसेच रस्त्यांच्या दुरुस्तीसाठीच डांबराचा किंवा अस्फाल्टिंगचा वापर करण्याच्या सूचना त्यांनी अभियंत्यांना दिल्या आहेत.

खोदकामावर र्निबंध

सेवा वाहिन्यांसाठी केलेल्या खोदकामामुळेही रस्त्यांचे आयुर्मान घटते. सेवा वाहिन्यांसाठी परवानगी न घेतल्यास खोदकामास परवानगी देण्यात येणार नाही, असे आयुक्तांनी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना बजावले आहे. ग्रीन फिल्ड प्रकल्पांतर्गत तयार करण्यात येणारे सर्व रस्ते सिमेंट किंवा यूटीडब्ल्यूटीमध्ये तयार करावेत आणि त्या रस्त्यांना सेवा वाहिन्यांसाठी चर खोदणे बंधनकारक करण्याचे आदेशही त्यांनी दिले आहेत.