News Flash

नाताळनिमित्त चर्चचा आध्यात्मिक तयारीवर भर

डिसेंबरच्या पहिल्या रविवारी सर्व चर्चमध्ये जांभळ्या रंगाची मेणबत्ती प्रज्वलित करण्यात आली होती.

 

रविवारपासून प्रार्थनास्थळांमध्ये प्रबोधन आणि प्रार्थनांचे आयोजन

नाताळचे पूर्वरंग :- मिल्टन सौदिया, वसई

वसई-विरारच्या पश्चिम पट्टय़ात मराठमोळय़ा ख्रिश्चनांची लोकसंख्या मोठी आहे. दिवाळी संपून मार्गशीर्षांतील बोचऱ्या थंडीची चाहूल लागली की या भागात नाताळचे वेध लागतात. यंदाही डिसेंबरच्या पहिल्या दिवसापासूनच नाताळनिमित्त वातावरणनिर्मिती सुरू झाली आहे. नाताळनिमित्त वसई परिसरातील चर्चनेही तयारी सुरू केली असून आध्यात्मिक तयारीला सुरुवात झाली आहे.

वसईत धर्माच्या सीमारेषा ओलांडून नाताळ सण साजरा होतो. यासाठी डिसेंबर महिन्यात चारही रविवारी चर्चमधून येशूख्रिस्ताचा जन्म आणि त्याची शांती व समेटाची शिकवण याबाबत प्रबोधन केले जाते. दोन रविवारी ‘येशूच्या स्वागतासाठी आमच्या मनातील पापाचा अंध:कार दूर होऊन अवतीभवती समेटाचे तसेच शांतीचे वातावरण निर्माण होऊ दे’, अशी प्रार्थनाही करण्यात आली. आता पुढील रविवारपासून चर्चमधून प्रबोधन केले जाणार आहे. भाविकांची कोणाविषयी मनात कटूता न ठेवता सर्वाशी बंधूभावाने राहावे. आपल्या आजूबाजूला शांतीसमेटाचे वातावरण निर्माण करावे, यासाठी भाविकांचे प्रबोधन केले जाणार असल्याचे फादर थॉमस लोपीस यांनी सांगितले. भाविकांचे प्रबोधन करण्यापूर्वी आम्हाला तयारी करावी लागते. त्यासाठी आगमन काळात धर्मगुरूंचा जास्तीत जास्त वेळ हा धर्मग्रंथ वाचन आणि चिंतनात जातो, असेही फादर लोपीस यांनी सांगितले.

नाताळपूर्व भाविकांच्या आध्यात्मिक तयारीचा आणखी एक भाग म्हणजे कन्फेशन अर्थात प्रायश्चित. डिसेंबरच्या पहिल्या रविवारी सर्व चर्चमध्ये जांभळ्या रंगाची मेणबत्ती प्रज्वलित करण्यात आली होती. जांभळा रंग पश्चातापाचा आहे. केलेल्य्ऋा चुकांची सुधारणा करा, असा संदेश यातून देण्यात आला होता. त्यानुसार वसईतील अनेक चर्चमध्ये भाविकांना प्रायश्चित घेता यावे यासाठी खास वेळ राखून ठेवलेली आहे. काही ठिकाणी चर्च परिसरातील भाविकांची जास्त असल्यामुळे प्रायश्चिचतविधीसाठी अन्य चर्चमधून धर्मगुरू मागवण्यात आले आहेत. आपल्या हातून ज्या काही चुका झाल्या असतील, त्याची कबुली धर्मगुरूंना देवून अशा चुका पुन्हा न करण्याचा निर्धार केला जातो. प्रायश्चिताच्या माध्यमातून भाविकांचे अंत:करण साफ करण्याचा प्रयत्न असतो, असे फादर निलेश तुस्कानो यांनी सांगितले.

नाताळ सुरू  झाल्याची वर्दी

आगमन काळात अध्यात्मिक तयारी पूर्ण केल्यानंतर २४ डिसेंबरला रात्री येशूजन्म विधी होईल. त्यानंतर बायबलमधील येशूच्या जन्माचा सविस्तर वृत्तान्त चर्चमध्ये वाचला जाईल. धर्मगुरू शांती, समेट, ऐक्य यावर आजचे संदर्भ देऊन मागदर्शन करतील. त्यानंतर गोठय़ातील बाळ येशूला वंदन, धुपारती करून खऱ्या अर्थाने उत्सवाला सुरुवात होईल. याचवेळी परमेश्वराचे स्तुती गीत म्हटले जाईल. त्यानंतर सगळ्या चर्चमध्ये काही वेळ घंटा वाजवल्या जातील. ही नाताळ सुरू झाल्याची वर्दी असेल.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 14, 2019 1:42 am

Web Title: conducting enlightenment and prayers at the places of worship since sunday akp 94
Next Stories
1 सभागृहाचे परस्पर नामांतर
2 कचरा विल्हेवाटीची पुन्हा सक्ती
3 दिव्यातील पुलासाठी २३ इमारतींवर हातोडा
Just Now!
X