News Flash

ठाण्यात पाणी देयकांमध्ये सावळागोंधळ

देयक भरलेले असतानाही थकबाकीची नोंद दाखविली जात असून अशा ग्राहकांना आधी देयके भरण्याची तंबी दिली जात आहे.

(संग्रहित छायाचित्र)

चालू आणि मागील वर्षांच्या पाणी देयकांची थकबाकी वसूल करण्यासाठी महापालिका प्रशासनाने विशेष मोहीम हाती घेतली आहे. त्यामध्ये पालिकेचे कर्मचारी पाणी देयक भरलेल्या ग्राहकांकडे जाऊन त्यांना देयक भरण्याचा आग्रह धरत असल्याची बाब समोर आली आहे. देयक भरलेले असतानाही थकबाकीची नोंद दाखविली जात असून अशा ग्राहकांना आधी देयके भरण्याची तंबी दिली जात आहे. तसेच काही ग्राहकांची नळजोडणीही खंडित करण्यात आली आहे.

ठाणे महापालिकेचा चालू आणि मागील वर्षांचा मालमत्ता कर आणि पाणी देयकांची थकबाकी वसूल करण्यासाठी प्रशासनाकडून विविध प्रयत्न सुरू आहेत. त्याचाच एक भाग म्हणून गेल्या काही दिवसांपासून शहरांमध्ये पालिकेची पथके फिरून थकबाकीदारांकडून कराची वसुली करीत आहेत. यामध्ये पाणी देयकाची थकीत रक्कम भरण्यास टाळाटाळ करणाऱ्यांच्या नळजोडण्या खंडित केल्या जात आहेत. या मोहिमेमुळे महापालिकेच्या तिजोरीत थकीत कर जमा होऊ लागला आहे. असे असतानाच आता पाणी देयकातील त्रुटींमुळे पालिकेच्या कारभारवर टीका होऊ लागली असून या चुकीच्या देयकांमुळे अनेक नागरिक त्रस्त झाल्याची बाब समोर आली आहे. काँग्रेसचे प्रदेश सदस्य राजेश जाधव यांनी पालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांच्याकडे तक्रार केली असून त्यामध्ये पाणी देयकातील त्रुटी निदर्शनास आणून दिल्या आहेत.

पाण्याची देयके अनेकांना मागील कित्येक वर्षे देण्यात आलेली नाहीत. ज्यांना देयके मिळाली आहेत, त्यांच्या देयकामध्ये थकबाकी दाखविण्यात आली. शहराच्या मध्यवर्ती भागात असलेल्या अनेक दुकानदारांच्या बाबतीतही असाच काहीसा प्रकार घडत आहे. त्यांना देयकेच वेळेवर मिळत नाहीत, काहींना देयकाची आकारणी करण्यात आलेली नाही.

‘आधी देयक भरा, मग बोलू’

ज्यांनी देयकांचा भरणा केला आहे, त्यांच्या नावावरही थकबाकी दाखविली जात आहे. याबाबत विचारणा केल्यास आधी देयक भरा आणि मगच बोलू अशी उत्तरे दिली जात आहेत. मागील कित्येक वर्षांपासून पाणीपुरवठा विभागात हा सावळागोंधळ सुरू असल्याचे त्यांनी पत्रात म्हटले आहे. तसेच मालमत्ता कर विभागाप्रमाणेच पाणीपुरवठा विभागाचा कारभारही योग्य पद्धतीने व्हावा, अशी मागणी त्यांनी केली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 23, 2021 12:10 am

Web Title: confusion in water payments in thane abn 97
Next Stories
1 वसई-विरार मध्ये विवा होम्सच्या कार्यालयावर ईडीच्या धाडी
2 पालिकांची कोट्यवधींची पाणी थकबाकी
3 कोपरी पुलासाठी पुन्हा वाहतूक बदल
Just Now!
X