वसई-विरार शहरात बंदला संमिश्र प्रतिसाद

इंधनाच्या भाववाढीविरोधात काँग्रेससह विरोधी पक्षांनी पुकारलेल्या बंदला वसईत संमिश्र प्रतिसाद मिळाला. काही भागात कडकडीत बंद पाळण्यात आला, तर काही भागात तुरळक प्रतिसाद मिळाल्याचे दिसून आले. वाहतूक व्यवस्था बंद असल्याने रहिवाशांचे प्रचंड हाल झाले. रिक्षा संघटनाही बंदमध्ये सामील झाल्याने नोकरदार वर्गाला पायपीट करतच रेल्वे स्थानक गाठावे लागले. महापालिकेच्या बसही रस्त्यावर न उतरल्याने ग्रामीण भागातील नागरिकांचे प्रचंड हाल झाले.

महागाईच्या विरोधात काँग्रेससह देशभरातील २१ प्रमुख विरोधी पक्षांनी सोमवारी बंद पुकारला. वसई-विरार शहरामध्ये बंदचे पडसाद उमटले. मात्र कुठेही हिंसक प्रकार घडले नाहीत. सकाळपासून अनेक भागातील दुकाने बंद होती. वसई, नालासोपारा, विरार पश्चिम येथे व्यापाऱ्यांनी बंद पाळला. नालासोपारा स्थानक परिसरात काही ठिकाणी तुरळक दुकाने उघडी होती. मात्र नालासोपारा पूर्वेला तुळिंज, आचोळा, संतोषभुवन, नगीनदासपाडा या परिसरात बंद पाळण्यात आला. मनसेने सकाळपासून मोर्चा  काढून वसई आणि नालासापोरा पूर्वेला बंद करण्याचे आवाहन केले. त्यामुळे सातिवली, वालीव, गोखिवरे आदी परिसरात कडकडीत बंद पाळण्यात आला. मनसेच्या शिष्टमंडळाने तहसीलदारांना वाढत्या महागाईसंदर्भात निवेदन दिले. सकाळी वसईत काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी फेरी काढून बंद करण्याचे आवाहन केले. आम्ही कोणत्याही प्रकारची मोडतोड न करता शांततेत मोर्चा काढून सरकारचा निषेध करत आहोत, असे काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष डॉमनिक डिमेलो यांनी सांगितले.

विरार शहरातही कडकडीत बंद पाळण्यात आला. विरार पूर्वेला काही ठिकाणी दुकाने सुरू होती. मात्र पश्चिमेकडील दुकाने बंद होती. रिक्षा वाहतूक सेवा बंद असल्याने विरारमध्येही नागरिकांचे हाल झाले. एरवी रिक्षामुळे होणारी वाहतूक कोंडी जाणवत नव्हती बंदमध्ये वसई-विरारमधील सर्वच रिक्षा संघटना सहभागी झाल्या होत्या. एसटी बस रस्त्यावर धावल्या नाहीत.

पालिकेची बससेवाही बंद होती. त्यामुळे सकाळच्या वेळी कामावर जाणाऱ्या नागिरकांचे हाल झाले. बंदमुळे कोणत्याही प्रकारची मोडतोड किंवा जाळपोळ होऊ  नये यासाठी आम्ही आगारातून बस सोडल्या नाहीत, असे वसई आगाराचे प्रमुख आर. बी. पारधी यांनी सांगितले.

सकाळपासूनच रिक्षा नसल्याने लोकांना पायपीट करावी लागत होती. दुपारच्या उन्हात नागरिकांना पायी चालण्याचा त्रास सहन करावा लागला. शाळा सुरू होत्या. मात्र शाळेतून मुलांना आणण्यासाठी रिक्षा नसल्याने पालक मुलांना पायी चालत घरी नेत होते. रेल्वे स्थानकांपासून लांब राहणाऱ्या रहिवाशांचे रिक्षा, बस नसल्याने हाल झाले.

पोलिसांचा बंदोबस्त

बंदच्या काळात कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांनी जागोजागी चोख बंदोबस्त ठेवला होता. मात्र कुठेही हिंसक प्रकार अथवा जबरदस्ती झाली नाही. मागील काही दिवसांत दोन वेळा मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी बंद पाळण्यात आला होता. आता महागाईच्या मुद्दय़ावरून बंद पाळण्यात आला. त्यामुळे नागरिकांनी नाराजी व्यक्त केली. गणेशोत्सवाच्या तयारासाठी सोमवारी सकाळी नागरिकांना काही खरेदी करता आली नाही.

पालघर जिल्ह्यात चांगला प्रतिसाद

भारत बंदला पालघर जिल्हय़ात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. पालघर, डहाणू, तलासरी, वाडा, विक्रमगड, जव्हार व मोखाडा तालुक्यात कडकडीत बंद पाळण्यात आला. शिवसेनेच्या पुरस्कृत रिक्षा युनियनने या बंदमध्ये सहभाग घेतला होता.