देशव्यापी बंदला ठाणे शहरात संमिश्र प्रतिसाद

इंधन दरवाढ आणि वाढत्या महागाईच्या निषेधार्थ काँग्रेससह देशभरातील २१ राजकीय पक्षांनी पुकारलेल्या ‘भारत बंद’ला ठाणे आणि आसपासच्या शहरांत संमिश्र प्रतिसाद मिळाला. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी सोमवारी सकाळी आंदोलन केल्याने शहरातील बाजारपेठा सायंकाळपर्यंत बंद होत्या. मात्र तुरळक अपवाद वगळता शहरातील बस, रेल्वे तसेच रिक्षा वाहतूक सुरळीत राहिल्याने सर्वसामान्यांना बंदचा फटका बसला नाही.

पेट्रोल, डिझेल आणि गॅसच्या दरात वाढ होत असल्यामुळे केंद्र शासनाचा निषेध नोंदविण्यासाठी काँग्रेस पक्षाने सोमवारी भारत बंदची हाक दिली होती. या बंदला राष्ट्रवादी आणि मनसेने पाठिंबा देत त्यासाठी रस्त्यावर उतरण्याचे जाहीर केले होते. त्यानुसार सोमवारी सकाळी काँग्रेस, राष्ट्रवादी आणि मनसे या तिन्ही पक्षाचे ठाण्यातील नेते आणि कार्यकर्त्यांनी मुंबई-नाशिक महामार्गावरून बैलगाडीतून प्रवास केला. नितीन कंपनी चौक ते तीन हात नाका असा हा प्रवास करण्यात आला. मात्र या आंदोलनामुळे ठाण्याहून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या मार्गिकेवरील वाहतुकीचे तीनतेरा वाजले. आंदोलनामुळे वाहनांचा खोळंबा होऊन नितीन उड्डाणपुलावर वाहनांच्या लांब रांगा लागल्या. त्यात या पुलावर वाहने येत असतानाच काही चालकांनी पुलावरून वळण घेत विरुद्ध दिशेने माघारी परतण्यास सुरुवात केली. त्यामुळे वाहने आमने-सामने येऊन पुलावर काही काळ कोंडी झाली. या कोंडीत एक रुग्णवाहिकाही अडकली होती. अन्य वाहनचालकांनी कोंडीतूनही रुग्णवाहिकेला मार्ग करून दिल्यामुळे काही वेळात रुग्णवाहिका कोंडीतून बाहेर पडली. तीन हात नाका भागात या तिन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करत चौकातील रस्त्यांवर ठिय्या आंदोलन करण्यास सुरुवात केली. त्यामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होऊन कोंडी झाली. अखेर पोलिसांनी मोठी कुमक मागवून आंदोलकांना ताब्यात घेतले व वाहतूक सुरळीत केली.

ठाणे, वागळे, कळवा, मुंब्रा आणि घोडबंदर भागांतील दुकाने, मॉल तसेच विविध आस्थापना बंद असल्याचे चित्र दिसून आले. शहरातील पेट्रोल पंपचालकांनी बंदला पाठिंबा देत पंप बंद ठेवले होते. त्यामुळे अनेक चालकांना इंधन समस्येचा सामना करावा लागला.

अंबरनाथमध्ये कडकडीत बंद

अंबरनाथमध्ये चांगली ताकद असलेल्या काँग्रेसच्या वतीने पश्चिमेतील इंदिरा भवनपासून मोर्चा काढण्यात आला. पूर्वेतील शिवाजी चौकापर्यंतच्या या मोच्र्यात काँग्रेस, राष्ट्रवादी आणि मनसेचे पदाधिकारी सहभागी झाले होते. अनेक व्यापारी आणि रिक्षाचालकांनी स्वत:हून रिक्षा बंद ठेवत बंदला पाठिंबा दिला. दुपापर्यंत तुरळक प्रमाणावर रस्त्यावर वाहतूक सुरू होती तर बदलापुरातही पूर्व आणि पश्चिम भागांत अनेक व्यापाऱ्यांनी दुकाने बंद ठेवली होती. बदलापूर पश्चिमेत सोमवार असल्याने दुकाने बंदच होती तर पूर्वेतही बंदला चांगला प्रतिसाद होता.

कल्याणमध्ये दुकाने सुरूच

कल्याणमध्ये सोमवारी सकाळी भारत बंदच्या पाश्र्वभूमीवर मनसे, राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली. सकाळच्या वेळेत कार्यकर्त्यांकडून हुल्लडबाजी होण्याच्या भीतीने बाजारपेठा बंद होत्या. काही होत नाही पाहून व्यापाऱ्यांनी दुकाने उघडली. रिक्षा, बस वाहतूक सुरळीत होती. कल्याण आगारातून बाहेरील परिस्थिती पाहून तुरळक बस बाहेर सोडण्यात येत होत्या. केडीएमटी बस रस्त्यावर धावत होत्या. रिक्षा वाहतूक सुरळीत होती. मनसेच्या कार्यकर्त्यांनी बाजारपेठ बंद करण्यासाठी प्रयत्न केले. पोलिसांनी ते हाणून पाडले. डोंबिवलीतील सर्व व्यवहार सुरळीत होते.