पालघरसह डहाणू, तलासरी, वाडा, विक्रमगड, जव्हार मोखाडा येथे कडकडीत बंद

इंधन दरवाढीच्या विरोधात काँग्रेस व समविचारी पक्षांनी पुकारलेल्या बंदला जिल्हय़ात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. पालघर, डहाणू, तलासरी, वाडा, विक्रमगड, जव्हार व मोखाडा तालुक्यात कडकडीत बंद पाळण्यात आला. विशेष म्हणजे शिवसेनेच्या पुरस्कृत रिक्षा युनियनने या बंदमध्ये सहभाग घेतल्याने नागरिक, कामगार व विद्यार्थ्यांचे हाल झाले. ठिकठिकाणी शासनाच्या विरोधात मोर्चा काढून इंधन दरवाढीच्या निर्णयाच्या विरोधात घोषणा देण्यात आल्या.

काँग्रेसने पुकारलेल्या या बंदला राष्ट्रवादी, मनसे, जनता दल, सीपीएम आदी पक्षांनी पाठिंबा दिला होता. या पक्षांच्या कार्यकर्त्यांनी एकत्रपणे आवाहन फेरी काढून व्यापारी, व्यावसायिक व नागरिकांनी बंदमध्ये सहभागी होण्याचे आवाहन केले. सकाळपासून भाजीपाला मार्केट बाजारपेठेतील दुकानदार, हॉटेल व इतर व्यापाऱ्यांनी ठेवला. सफाळे, तलासरी येथे भरणारे आठवडा बाजारामध्येदेखील शुकशुकाट होता.

रिक्षाचालकांनी रिक्षा बंद केल्याने एसटी सेवेकडे प्रवाशांनी प्राधान्य दिले. काही काळाने एस.टी. बस डेपोमध्ये आंदोलक जाऊ न दुपारनंतर अनेक ठिकाणी एस.टी. सेवा बंद पाडली. यामुळे बाहेरगावाहून आलेल्या तसेच शाळेकडे निघालेल्या व शाळेतून सुटलेल्या विद्यार्थी-पालकांचे हाल झाले.

बंदमधून शैक्षणिक संस्था, आरोग्याशी संबंधित सेवा, अत्यावश्यक सेवांना वगळण्याचे आयोजकांनी यापूर्वी आयोजित पत्रकार परिषदेत जाहीर केले होते. मात्र बंदमध्ये सहभागी काही पक्षांच्या नेत्यांनी स्कूल बसच्या संघटनेला व रिक्षाचालकांना खासगीत धमकावल्याने या सेवा बंद ठेवण्यात आल्या.

पालघरमध्ये किरकोळ वादावादी

दरम्यान काही भाजपा नेत्यांनी रिक्षा बंद ठेवल्याने नागरिकांची गैरसोय होत असल्याचे कारण सांगत रिक्षा सुरू करण्याचा पालघरमध्ये प्रयत्न केला. यामुळे किरकोळ वादावादी झाली. तर गणेश उत्सवाच्या पाश्र्वभूमीवर दुकाने बंद असल्याने गणेश भक्तांची गैरसोय झाली. दुपारी ३ नंतर अनेक दुकाने सुरू झाली व काही प्रमाणात रिक्षा सुरू करण्यात आल्या. पालघरमधील बंद शांतपूर्ण राहिला

उद्योगांत, शाळेतील उपस्थितीवर परिणाम

तारापूर औद्यौगिक वसाहतीसह, पालघर, आच्छाड, वाडा येथील उद्योगांमधील कामगारांच्या उपस्थितीवर आज बंदचा परिणाम दिसला. अनेक ठिकाणी कामगार व अधिकारी काही किलोमीटर पायी चालत आले. पालघर तालुक्यातील काही शाळांनी खबरदारीची उपाययोजना म्हणून पहिले सत्र बंद ठेवले होते. मात्र दुपारच्या सत्राला अनेक ठिकाणी शिक्षक वर्ग पोहोचू न शकल्याने विद्यार्थ्यांना शिकविण्यास पुरेसा शिक्षकवर्ग उपलब्ध झाला नाही.

तलासरी आठवडे बाजार बंद

कासा, तलासरी, विक्रमगड तसेच जव्हार तालुक्यात आज महागाईच्या विरोधात कडकडीत बंद पाळण्यात आला. तलासरी शहरात आठवडे बाजार बंद ठेवण्यात आला. त्यामुळे बाजारासाठी येणाऱ्या ३० ते ३५ खेडोपाडय़ातील नागरिकांना त्रास झाला. गणेशोत्सवाची खरेदी करण्यासाठी ग्रामस्थ आले होते, पण् त्यांना रिकाम्या हाती परत जावे लागले.