अंबरनाथ: महाविकास आघाडीत बिघाडी रोखण्यासाठी वरिष्ठ स्तरावर तीनही पक्षांचे नेते कसोशीने प्रयत्न करत असतानाच स्थानिक पातळीवर मात्र एकमेकांच्या पक्षांचे नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांची पळवापळवी सुरू आहे. अंबरनाथ नगरपालिकेतील काँग्रेसच्या नगरसेविका, माजी नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांचा राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये नुकताच प्रवेश पार पडला. यावेळी गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड स्वत: उपस्थित होते. या घडामोडीमुळे निवडणुकीच्या तोंडावर महाविकास आघाडीत स्थानिक पातळीवर संघर्ष उफाळण्याची चिन्हे आहेत.

राज्याचे गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या उपस्थितीत मुंबई येथील कार्यालयात अंबरनाथ कॉंग्रेसच्या विविध पदाधिकारी, आजी-माजी नगरसेवकांना राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात प्रवेश देण्यात आला. यात कॉंग्रेसच्या नगरसेविका श्रुती सुरेश सिंग, काँग्रेसचे युवक शहर अध्यक्ष प्रकाश पाटील, माजी नगरसेवक नरेंद्र काळे, कॉंग्रेस उत्तर भारतीय कक्षाचे अध्यक्ष सुरेश सिंग यांचा समावेश आहे. या पक्षप्रवेशामुळे अंबरनाथ नगरपालिका निवडणुकीत महाविकास आघाडीची शक्यता धुसर झाली आहे. एकीकडे राज्यात महाविकास आघाडीतील महत्त्वाचे नेते महाविकास आघाडी तळागाळात पोहोचवण्यासाठी प्रयत्नशील असतानाच स्थानिक पातळीवर मात्र आघाडीतील पक्षाच्या पदाधिकाऱ्यांचीच पळवापळवी सुरू असल्याचे चित्र पाहायला मिळते आहे. अंबरनाथ आणि कुळगाव बदलापूर नगरपालिकेच्या निवडणुका येत्या काही दिवसात घोषित होण्याची शक्यता आहे. त्यामुळे राजकीय पक्षांनी पक्ष बांधणी आणि प्रचाराला सुरुवात केली आहे. सर्वच पक्ष आपल्या पक्षात इतर पक्षातील निवडून येण्याची क्षमता असलेल्या पदाधिकाऱ्यांना, आजी-माजी नगरसेवकांना प्रवेश देण्यास सुरुवात झाली आहे. दोन महिन्यांपूर्वी बदलापूर शहर शिवसेनेच्या वतीने राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या एका महिला पदाधिकाऱ्याला पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते प्रवेश दिला होता. याची माहिती वरिष्ठ नेत्यांना कळताच या नेत्यांनी स्थानिक पदाधिकाऱ्यांना झापले होते. त्यामुळे दुसऱ्याच दिवशी त्या महिला पदाधिकाऱ्याची राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात वापसी करण्यात आली होती. मात्र आता राष्ट्रवादीनेच काँग्रेसच्या गोटाला सुरुंग लावल्याने दोन्ही पक्षांतील वाद वाढण्याची शक्यता आहे.