23 January 2021

News Flash

अंबरनाथमध्ये महाविकास आघाडी?

२०१५ मध्ये झालेल्या नगरपालिका  निवडणुकीत काँग्रेसने ८ जागा जिंकत १२ हजार मते मिळवली होती.

काँग्रेसची शिवसेनेकडे १८ जागांची मागणी

अंबरनाथ: राज्यात भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेल्या शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या तिन्ही पक्षांच्या महाविकास आघाडीचा प्रयोग अंबरनाथ नगरपालिकेच्या निवडणुकीतही होण्याची चिन्हे आहेत. अंबरनाथमध्ये काँग्रेसने शिवसेनेकडे आघाडीसाठी हात पुढे केला असून १८ जागांची मागणी केली आहे. अंबरनाथ आणि बदलापूर या दोन्ही नगरपालिकांमध्ये सत्ताधारी असलेली शिवसेना येथील निवडणुकांत महाआघाडी करण्यास उत्सुक नसल्याचे समजते. मात्र, तरीही दोन्ही पक्षांच्या नेत्यांमध्ये प्राथमिक स्तरावर चर्चा सुरू असल्याचे समजते.

राज्यात एकेकाळी नगरपालिकेतील सत्तेचा अंबरनाथ पॅटर्न गाजला होता. मनसेने शिवसेनेला पाठिंबा देत सर्वाना आश्चर्याचा धक्का दिला होता. तेव्हापासून अंबरनाथमधील राजकीय गणिते राज्याच्या गणितांपेक्षा वेगळी असल्याचे चित्र आहे. अडीच वर्षांपूर्वी शिवसेनेच्या प्रज्ञा बनसोडे या अंबरनाथ नगरपालिकेच्या नगराध्यक्षपदावरून पायउतार झाल्या होत्या. त्यानंतर झालेल्या नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत शिवसेनेच्या मनीषा वाळेकर यांच्याविरोधात कोणत्याच पक्षाने उमेदवार उभा केला नव्हता. त्यामुळे त्यांची बिनविरोध निवड झाली होती. २०१५ मध्ये झालेल्या पालिका निवडणुकांनंतर शिवसेनेने राष्ट्रवादी काँग्रेस, मनसेला विषय समित्यांची सभापतीपद देत सत्तेत सामील करून घेतले होते. काँग्रेस मात्र विरोधी बाकांवर होती. मात्र, २०१७ मध्ये काँग्रेसने नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत अर्जच दाखल केला नाही. त्यामुळे शिवसेनेच्या मनीषा वाळेकर यांची नगराध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली होती. त्यानंतर झालेल्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने मुसंडी मारण्यास सुरुवात केली होती. २०१५ मध्ये झालेल्या नगरपालिका  निवडणुकीत काँग्रेसने ८ जागा जिंकत १२ हजार मते मिळवली होती. मात्र गेल्या वर्षांत झालेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने ३० हजार मतांचा पल्ला पार केला आहे. त्यामुळे काँग्रेसची ताकद वाढलेली आहे.

राज्यात झालेल्या महाविकास आघाडीच्या प्रयोगानंतर भाजपला रोखण्यासाठी एकमेकांविरुद्ध लढण्याऐवजी शिवसेनेसोबत लढण्याची काही काँग्रेस नेत्यांची मागणी आहे. या मागणीच्या आधारे काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांनी शिवसेनेच्या प्रमुख नेत्यांशी चर्चा केल्याची माहिती सूत्रांनी दिली. या चर्चेदरम्यान काँग्रेसने १८ जागांची मागणी करत  छोटय़ा भावाच्या भूमिकेत राहण्याची इच्छा प्रगट केल्याचे सूत्रांनी सांगितले. त्यामुळे  महाविकास आघाडीसाठी काँग्रेस आग्रही असल्याचे चित्र असून काँग्रेसच्या या प्रस्तावावर शिवसेना आता काय भूमिका घेते याकडे सर्वाचे लक्ष लागले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 3, 2020 4:31 am

Web Title: congress demands 18 seats to shiv sena in ambernath zws 70
Next Stories
1 ठाणे स्थानक परिसरात विस्तीर्ण पदपथ
2 कलाविष्काराने अंबरनाथकर रसिक मंत्रमुग्ध
3 महावितरणकडून अनेक प्रलंबित कामांना सुरुवात
Just Now!
X