कल्याण-डोंबिवली महापालिकेची आगामी निवडणूक लढवायची असेल तर नागरिकांचे प्रश्न सोडवा. विकासाच्या मुद्दय़ावर नागरिकांच्या पाठीशी राहा. येणारी पालिका निवडणूक काँग्रेस स्वतंत्रपणे लढवेल, असे संकेत काँग्रेसच्या नेत्यांनी डोंबिवलीतील काँग्रेसच्या मेळाव्यात दिले. लोकसंख्येप्रमाणे पालिकेतील नगरसेवकांची संख्या सुमारे १२२ असेल, या सर्व जागा काँग्रेस लढविणार असल्याचे यावेळी जाहीर करण्यात आले.
कल्याण डोंबिवली जिल्हा काँग्रेसतर्फे माऊली सभागृह येथे कार्यकर्त्यांच्या मेळाव्याचे आयोजन केले होते. लोकसभेसह, विधानसभा निवडणुकीत सपाटून मार खाल्याने मरगळ आलेल्या काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये नवीन उर्जा निर्माण करावी या उद्देशाने कल्याण शहर जिल्हा काँग्रेस समिती व काँग्रेस प्रदेश प्रतिनिधी व माजी नगरसेवक संतोष केणे यांनी या मेळाव्याचे संयोजन केले होते. यावेळी पक्षाचे निरीक्षक पृथ्वीराज साठे, मदन चव्हाण, अशोक जाधव, माणिकराव जगताप, जिल्हाध्यक्ष सचिन पोटे, ज्येष्ठ नेते संतोष केणे, नगरसेवक विश्वनाथ राणे, शकील खान आदी पदाधिकारी
उपस्थित होते.
केंद्र, राज्यातील भाजप सरकारने जनतेला विकासाची आश्वासने देऊन आता गैरव्यवहार करण्यास सुरूवात केली आहे. त्यामुळे जनतेच्या नजरेतून ही सरकार उतरत चालली आहेत. त्याचा पुरेपूर लाभ उठवण्याची ही संधी आहे, असे सांगत साठे यांनी जनतेचे प्रश्न सोडवण्याला प्राधान्य द्या. हेच विकासाचे प्रश्न पुढे आपला मार्ग पुढे नेण्यास साहाय्य करणार आहेत. कल्याण डोंबिवली पालिकेत अठरा वर्ष शिवसेना-भाजप युतीची सत्ता आहे. कोटय़वधी रूपयांचे अर्थसंकल्प असताना येथील सत्तेने फक्त गैरव्यवहार, टक्केवारी, निविदांना महत्व दिले. त्यामुळे ही ऐतिहासिक, सांस्कृतिक शहरे आता बकाल झाली आहेत. हे जनतेसमोर ठासून मांडण्याची तयारी काँग्रेस कार्यकर्त्यांनी करावी. जोपर्यंत पालिकेतील अनेक वर्षांंच्या सत्तेला धडा बसत नाही तोपर्यंत या शहरांचा विकास होणे अशक्य आहे, असे साठे यांनी सांगितले.

चुरस वाढणार
आगामी पालिका निवडणूक स्वबळावर लढण्यासाठी सज्ज राहण्याचे आवाहन त्यांनी पदाधिकारी, कार्यकर्त्यांना केले. एकीकडे शिवसेना-भाजप वेगळे लढण्याचे संकेत देत असतानाच आघाडीही वेगळी लढणार असल्याने आगामी पालिका निवडणुकीत रंगत येणार असल्याचे बोलले जाते