जाहीरनाम्यातील १३५पैकी १० आश्वासनांचीच पूर्ती

कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या ऑक्टोबर २०१० मध्ये झालेल्या निवडणुकीत काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसने आघाडी केली होती. आघाडीच्या नेत्यांनी जनतेसमोर मतांचा जोगवा मागण्यासाठी जाताना शहरांचा सर्वांगीण विकासाचा देखावा उभी करणारी १३५ आश्वासने जाहीरनाम्याद्वारे दिली. मात्र गेल्या पाच वर्षांत आघाडीतील नगरसेवकांनी केवळ १० आश्वासनेच पूर्ण करण्याचा प्रयत्न केला. महापालिकेवर राज्य जरी शिवसेना-भाजप युतीचे असले तरी राज्यात काँग्रेस आघाडीचे सरकार होते. पालिका निवडणुकीच्या वेळी काँग्रेसच्या तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी विकासाची मोठी स्वप्ने शहरवासीयांना दाखवली होती. राज्यातील तत्कालीन काँग्रेस सरकारने आणि पालिकेतील विरोधी बाकावरील काँग्रेस आघाडीने शहरासाठी काहीही केले नाही. १२५ आश्वासनांचे काय झाले, याचे उत्तर देण्याची वेळ यावेळच्या पालिका निवडणुकीत आघाडीच्या नेत्यांसमोर आली आहे.
मागील पाच वर्षांपूर्वी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी गळ्यात गळे घालून निवडणूक लढवली. महापालिका सभागृहात मात्र त्यांचे नाते विळय़ा-भोपळय़ासारखे होते. जनतेने आपल्याला बहुमत दिले नसले तरी, विरोधी बाकावर बसवून आक्रमकपणे काम करण्याची संधी दिली आहे याचा विचार न करता, या दोन्ही पक्षांच्या नगरसेवकांनी सत्ताधारी शिवसेना, भाजपबरोबर गुळपीठ करून महापौर, स्थायी समितीच्या आतल्या दालनात बसून जेवढे लोणी खाता येईल, तेवढे खाण्याचा प्रयत्न केला.
काँग्रेस, राष्ट्रवादीमधील काही ठरावीक नगरसेवक च पदाधिकारी हे लोणी खात असल्याने पक्षातील अन्य नगरसेवकांचा तिळपापड होत होता. हा त्रागा जाहीरपणे व्यक्त करणे आघाडीतील अस्वस्थ नगरसेवकांना जमत नव्हते. सर्वसाधारण सभेत नागरी विकासावर चर्चा सुरू असताना काँग्रेस, राष्ट्रवादीचे नगरसेवक परस्परविरोधाची भूमिका घेऊन भांडत असल्याचे चित्र अनेक वेळा दिसले. त्याचा लाभ सत्ताधारी शिवसेना-भाजपने वेळोवेळी उठवला.
आघाडीच्या काही नगरसेवकांची पदे बेकायदा बांधकामे केली म्हणून रद्द झाली. काही जण पद रद्द होण्याच्या वाटेवर आहेत. या हालचालींवरून जनतेचे प्रश्न सोडविण्यापेक्षा स्वत:च्या तुंबडय़ा व स्वत:ची कामे करून घेण्यात आघाडीच्या नगरसेवकांचा वेळ गेला. १२५ आश्वासने जाहीरनाम्यात तशीच पडून राहिली. तत्कालीन काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष जयनारायण पंडित, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अभिमन्यू गायकवाड यांच्या पुढाकाराने हा जाहीरनामा प्रकाशित करण्यात आला होता. आज हे दोघेही पक्षात आहेत की नाही अशी परिस्थिती आहे.
जेरीस आणण्याएवढे संख्याबळ, तरीही..
आघाडीतील काही नगरसेवक सर्वसाधारण सभेत बेंबीच्या देठापासून सत्ताधारी शिवसेनेवर, प्रशासनावर तोंडसुख घेत असत. सभा संपली की शिवसेनेचे महापौर, सभापती, काही अधिकाऱ्यांच्या दालनात आपल्या कामाच्या नस्ती मंजूर करणे, नगररचना विभागात अडलेले बांधकामांचे प्रस्ताव, टीडीआर लाटण्याचे उद्योग करीत होते. सत्ताधाऱ्यांना जेरीस आणतील एवढे आघाडीचे २९ नगरसेवक सभागृहात होते. पण, या नगरसेवकांचा प्रभाव सभागृहात कधीच दिसून आला नाही. पाच वर्ष कल्याण पूर्व भागाला पाणीटंचाईची बोंब होती. या प्रश्नांवर आघाडीच्या नगरसेवकांना वेळोवेळी सभा तहकुबी घ्याव्या लागल्या.
जाहीरनाम्यातील काही आश्वासने
’ कल्याणजवळ विकास केंद्र.
’ आधारवाडी क्षेपणभूमी बंद करून उंबर्डे येथे क्षेपणभूमी
’ तिसगाव येथे ५५ कोटी खर्चून सुपर स्पेशालिटी रुग्णालय
’ शहराच्या वेशीवर बाह्य वळण रस्ता
’ ठाणे-भिवंडी-कल्याण मार्गावर मेट्रो
’ गौरीपाडा येथे सिटी पार्क.
’ शहर स्वच्छतेसाठी सफाई ब्रिगेड स्थापन करणार
’दुर्गाडी येथे ट्रक टर्मिनल उभारणार
’ विठ्ठलवाडी येथे सुसज्ज आगार