ठाणे महापौरांविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस सदस्यांची घोषणाबाजी

ठाणे : ठाणे महापालिका स्वीकृत सदस्य पदावर संख्याबळाच्या आधारे पक्षाने  केलेल्या नावावर शिक्कामोर्तब करण्याचा आग्रह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने काही दिवसांपासून धरला असतानाच शुक्रवारी झालेल्या सर्वसाधारण सभेत मात्र सत्ताधारी शिवसेनेच्या मदतीने काँग्रेसचे शहराध्यक्ष मनोज शिंदे यांची निवड करण्यात आली.

राष्ट्रवादीचे मनोहर साळवी यांचे नाव डावलून ही निवड करण्यात आली असून या निवडीवरून राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी सभागृहात महापौरांविरोधात घोषणाबाजी केल्याने तणाव निर्माण झाले होते. पालिकेच्या निवडणूक होऊन दीड वर्षांचा काळ लोटला तरी स्वीकृत सदस्यांची निवड करण्यात आली नव्हती. शुक्रवारी झालेल्या सर्वसाधारण सभेच्या विषय पटलावर निवडीचा प्रस्ताव मंजुरीसाठी ठेवण्यात आला होता. पालिकेतील पक्षीय संख्याबळानुसार शिवसेनेचे तीन, भाजपचा एक आणि राष्ट्रवादीचा एक निवडला जाणार होता. शिवसेनेकडून दशरथ पालांडे, जयेश वैती, राजेंद्र साप्ते, राष्ट्रवादीकडून मिलिंद साळवी, मनोहर साळवी, भाजपकडून संदीप लेले यांनी अर्ज दाखल केले होते. राष्ट्रवादीकडून दोघांपैकी मनोहर साळवी यांचे नाव निश्चित करण्यात आले होते. परंतु संख्याबळ नसतानाही काँग्रेसकडून शहराध्यक्ष मनोज शिंदे यांनी अर्ज दाखल केला होता.

राष्ट्रवादीच्या जागेवर निवड होण्यासाठी शिंदे यांनी प्रशासनाच्या मदतीने मोर्चेबांधणी केली होती. त्यास राष्ट्रवादीने विरोध करत मनोहर साळवी यांच्या नावासाठी आग्रह धरला होता. त्यामुळे या निवडीकडे सर्वाचे लक्ष लागले होते. दरम्यान, शुक्रवारी झालेल्या सर्वसाधारण सभेत महापालिका सचिव अशोक बुरपुल्ले यांनी शिवसेनेचे दशरथ पालांडे, जयेश वैती, राजेंद्र साप्ते आणि भाजपचे संदीप लेले या चौघांच्या नावांवर शिक्कामोर्तब केला. बेकायदा बांधकामामुळे मनोहर साळवी यांचे नगरसेवकपद यापूर्वी अपात्र ठरविण्यात आले असून या निर्णयाविरोधात त्यांनी उच्च न्यायालयातून स्थगिती आदेश मिळविला आहे. याप्रकरणी महापालिकेने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. त्यामुळे त्यांच्या निवडीबाबत शासनाच्या विधी विभागाचा अभिप्राय मागविण्यात आला आहे. तोपर्यंत त्यांचे नाव स्थगित ठेवण्यात येणार असल्याचे सचिव बुरपुल्ले यांनी स्पष्ट केले. परंतु नियमानुसार पाच सदस्यांच्या नावाची घोषणा होणे गरजेचे असून मनोहर साळवी यांच्या व्यतिरिक्त आणखी दोन अर्ज दाखल झाले आहेत. त्या अर्जामधून सदस्याची निवड करण्यात यावी, असा आग्रह सभागृह नेते नरेश म्हस्के यांनी धरला. त्यास राष्ट्रवादीकडून विरोध होत असतानाच महापौर मीनाक्षी शिंदे यांनी काँग्रेसचे मनोज शिंदे यांच्या निवडीची घोषणा केली.

ही निवड चुकीची असल्याचे सांगत विरोधी पक्ष नेते मिलिंद पाटील यांच्यासह राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी महापौरांविरोधात घोषणाबाजी केली. त्यामुळे सभागृहात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.