विधान परिषदेसाठी ठाण्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमधून होणाऱ्या निवडणुकीसाठी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते वसंत डावखरे यांच्या उमेदवारीला शंभर टक्के पाठिंबा असल्याची घोषणा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी दोन महिन्यांपूर्वी ठाण्यात केली असतानाच मंगळवारी ठाण्यात झालेल्या काँग्रेसच्या मेळाव्यात काही पदाधिकाऱ्यांनी स्वबळावर निवडणूक लढण्याचा सूर आळवला. मात्र, काही पदाधिकाऱ्यांनी राष्ट्रवादीसोबत जाण्याचा आग्रह धरला आहे. या पाश्र्वभूमीवर निवडणुकीतील आघाडीचा निर्णय प्रदेशपातळीवर सोपविण्यात आला आहे.
ठाणे स्थानिक स्वराज्य संस्थांमधून विधान परिषदेची निवडणूक होणार असून या निवडणूकीच्या पाश्र्वभूमीवर काँग्रेसचे ठाणे जिल्हा पालक नारायण राणे यांनी मंगळवारी ठाणे जिल्ह्य़ातील पक्ष पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. या बैठकीमध्ये विधान परिषद निवडणूकसंबंधी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांसोबत चर्चा करण्यात आली असून या चर्चेदरम्यान पक्ष पदाधिकाऱ्यांचे तीन मतप्रवाह पुढे आले आहेत. राष्ट्रवादीसोबत जाऊ नये, राष्ट्रवादीसोबत जावे आणि काँग्रेस पक्षाने स्वबळावर निवडणूक लढवावी, असे मतप्रवाह पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केले.दरम्यान, स्थानिक पातळीवरील मतभेद बाजूला सारून पक्षाचे काम करण्याच्या पदाधिकाऱ्यांना सूचना दिल्याचे राणे यांनी सांगितले.