कल्याण डोंबिवली महापालिका हद्दीतील नागरी समस्यांचा बोजवारा उडाला आहे. प्रशासन याविषयी मख्ख असल्याची जाणीव मागील चार वर्षांत प्रथमच कल्याण, डोंबिवलीतील काँग्रेस पदाधिकाऱ्यांना झाली आहे. महापालिकेत विरोधी बाकांवर बसणाऱ्या काँग्रेसच्या सदस्यांनी सत्ताधारी शिवसेनेच्या नेत्यांना एखाद्या प्रश्नावर अपवादानेच खिंडीत गाठले आहे. असे असताना तत्कालीन आयुक्तांची बदली होताच, नवीन आयुक्तांवरील दबाव वाढवण्यासाठी, प्रशासनाच्या ढिम्मपणाचा निषेध करण्यासाठी काँग्रेसने सोमवारी महापालिकेवर मोर्चा काढला.
कल्याण डोंबिवली महापालिका हद्दीत क्षेपणभूमी नसल्याने कचऱ्याची समस्या गंभीर झाली आहे. झोपु योजनेत गैरव्यवहार झाला आहे. सिमेंट काँक्रीटचे रस्ते रखडले आहेत. अनेक भागांत तीव्र पाणीटंचाई असून, चोवीस तास पाणी देण्याचे महापालिकेचे आश्वासन हवेत विरले आहे. या नागरी समस्यांवर आवाज उठवण्यासाठी काँग्रेसचे नगरसेवक सचिन पोटे यांच्या नेतृत्वाखाली महापालिकेवर मोर्चा काढण्यात आला होता. मागील चार वर्षांच्या काळात नागरी समस्यांवर आवाज उठवणाऱ्या प्रसिद्धिमाध्यमांना सर्वसाधारण सभेत चिमटे काढणे, महापालिका आयुक्तांची पाठराखण करणे यांसारखे प्रकार वेळोवेळी काँग्रेस नगरसेवकांकडून सर्वसाधारण सभेत करण्यात आले आहेत. चार वर्षांच्या काळात नागरी समस्यांचा बोजवारा उडत असताना, कधीच जनतेच्या प्रश्नावर रस्त्यावर न आलेल्या काँग्रेस पदाधिकाऱ्यांना महापालिका निवडणुका तोंडावर आल्या असताना नागरी समस्यांची जाणीव झाल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. तत्कालीन आयुक्तांची पाठराखण करणारे काँग्रेसचे नगरसेवक महापालिकेला आयएएस आयुक्त मिळावा म्हणून का प्रयत्नशील राहिले नाहीत, असा सवालही कल्याण, डोंबिवलीतील सर्वसामान्य नागरिक उपस्थित करत आहेत. यापूर्वीच्या काँग्रेस आघाडी सरकारने रामनाथ सोनवणे यांना कल्याण डोंबिवली पालिकेत आयुक्त पदाची नियमबाह्य़पणे नियुक्ती दिली. त्या वेळी काँग्रेस नगरसेवक गप्प का बसले, असे प्रश्न सुज्ञ नागरिकांकडून उपस्थित करण्यात येत आहेत. हा मोर्चा आहे की नवीन आयुक्तांवर दबाव टाकण्यासाठी खेळलेली खेळी अशी चर्चा पालिकेत रंगली आहे.