उल्हासनगरात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने पारंपारिक मित्र पक्ष असलेल्या काँग्रेसला आघाडीच्या चर्चेपासून लांब ठेवण्याचा निर्णय घेतला असून काँग्रेससोबत आघाडी संबंधी चर्चाही अद्याप सुरू केलेली नाही. काँग्रेसचे स्थानिक नेते मात्र आघाडी व्हावी यासाठी उत्सुक आहेत. जातीयवादी पक्षांना सत्तेपासून दूर ठेवायला हवे, असा नेहमीचाच राग पक्षातर्फे आळवला जात आहे.

ठाण्यापासून थेट बदलापूपर्यंत महत्वाच्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये शिवसेना आणि भाजप युतीची सत्ता असली तरी उल्हासनगर शहरात मात्र अजूनही राष्ट्रवादी काँग्रेसचा दबदबा आहे. सात वर्षांपूर्वी झालेल्या विधानसभा निवडणुकीत पप्पू कलानी यांना पराभवाचा धक्का देत भाजपचे कुमार आयलानी आमदार म्हणून निवडून आले. त्यापाठोपाठ झालेल्या महापालिका निवडणुकीत आयलानी यांनी शिवसेनेच्या साथीने उल्हासनगर महापालिकेतील कलानी यांची सत्ता उलथवून लावली. त्यामुळे पप्पू युगाचा अंत झाल्याची चर्चाही त्यावेळी रंगली होती. यंदाच्या विधानसभा निवडणुकीत मात्र नरेंद्र मोदी यांची राज्यभर हवा असतानाही कलानी यांच्या पत्नी ज्योती यांनी आयलानी यांचा मोठय़ा मताधिक्याने पराभव केला. त्यामुळे नवी मुंबई पाठोपाठ उल्हासनगर महापालिकेतही राष्ट्रवादीच्या सत्तेच्या आशा प्रबळ झाल्या असून त्यामुळे हा पक्ष आघाडीसंबंधी कोणता निर्णय घेतो याकडे सर्वाचे लक्ष लागले आहे.

ओमी यांची स्वतंत्र्य चाचपणी

येत्या निवडणूकीत ओमी कलानी यांचा भाजपामध्ये प्रवेश झाला नाही तर राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष स्वतंत्रपणे लढू शकतो किंवा स्वतची आघाडी उघडली जाऊ शकते, अशी चर्चा येथील राजकीय वर्तुळात रंगली आहे. स्वत:ची ताकद आजमावून एकहाती सत्ता मिळवण्याचा प्रयत्न यानिमीत्ताने कलानी गटातर्फे केली जाणार आहे.

ओमी यांची प्रतिष्ठेची लढाई

पप्पू कलानी यांचा वारसा घेऊन राजकारणात आलेल्या ओमी कलानी यांनीही आपली ताकद वाढवण्यास सुरुवात केली आहे. महापालिकेच्या पोटनिवडणुकांमध्ये त्याचा प्रत्यय आला होता. त्यामुळे सत्ताधारी शिवसेना-भाजपला ओमी कलानी यांचा वाढता प्रभाव रोखण्याचे आव्हान आहे. असे असताना पारंपरिक मित्रासोबत आघाडी न करण्याच्या मनस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते असल्याची चर्चा आहे. निवडणुका जाहीर होऊ नही काँग्रेससोबत कोणत्याही प्रकारची चर्चा अद्याप सुरू झालेली नाही, अशी माहिती राष्ट्रवादीतील सुत्रांनी दिली. त्यामुळे शहरात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि काँग्रेस यांच्यात आघाडीची शक्यता धुसर झाली आहे. याबाबत काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष जयराम लुल्ला यांना विचारले असता, भाजप शिवसेनेला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची आघाडी होणे आवश्यक असून आम्ही त्यासाठी प्रयत्नशील आहोत, असे त्यांनी सांगितले. तसेच साई पक्षालाही आघाडीत सहभागी करण्याचा विचार आहे. मात्र राष्ट्रवादी काँग्रस पक्षाने प्रतिसाद दिल्यास हे शक्य होईल, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.