शिवसेना, काँग्रेस स्वतंत्र; भाजपची ‘कोणार्क’शी व राष्ट्रवादीची सपशी आघाडी

गेल्या काही महिन्यांपासून एकमेकांवर चिखलफेक करत स्वबळावर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांना सामोरे जाणाऱ्या शिवसेना आणि भाजपने भिवंडी महापालिकेच्या निवडणुकीतही युती न करण्याचा निर्णय घेतला आहे. तर युतीच्या पावलावर पाऊल टाकत काँग्रेस व राष्ट्रवादीही स्वतंत्रपणे निवडणूक रिंगणात उभे ठाकले आहेत. त्यातल्या त्यात भाजपने येथील कोणार्क विकास आघाडीशी तर राष्ट्रवादीने समाजवादी पक्षाशी हातमिळवणी करून आपले संख्याबळ वाढवण्यासाठी प्रयत्न केले आहेत. त्यामुळे भिवंडीतील मुस्लीमबहुल परिसरात काँग्रेस विरुद्ध राष्ट्रवादी-सप असा सामना रंगण्याची चिन्हे आहेत.

भिवंडी शहरातील राजकारणाचा बाज लक्षात घेता भाजपसोबत युती व्हावी यासाठी शिवसेनेतील एक मोठा गट सुरुवातीपासून प्रयत्नशील होता. या भागात मुस्लीमबहुल वस्त्यांमधील मतांचे गणित लक्षात घेता युती झाल्यास काँग्रेस, समाजवादी आणि राष्ट्रवादीसोबत लढत देणे सोपे जाईल, असे समीकरण शिवसेनेच्या ठाण्यातील नेत्यांनी भाजपपुढे ठेवले होते. यावेळी शिवसेनेने ९० पैकी तब्बल ५० जागांची मागणी केल्यानंतर युतीत पुन्हा दरी निर्माण झाली. अखेर दोन्ही पक्षांनी स्वतंत्रपणे निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला. भाजपने त्यानंतर तातडीने कोणार्क विकास आघाडीसोबत मोट बांधली आहे. दुसरीकडे कोणार्क आणि काँग्रेसमध्ये फाटाफूट होऊन स्थापन झालेल्या ‘भिवंडी डेव्हलपमेंट फ्रंट’कडून १६ उमेदवारांनी अर्ज दाखल केले असून या आघाडीच्या उमेदवारांविरोधात काही ठिकाणी भाजपने आपले उमेदवार दिले नसल्याची चर्चा आहे. यामागे निवडणुकीनंतरची समीकरणे जुळवण्याचे प्रयत्न असले तरी पक्षाच्या या निर्णयावर निष्ठावंतांच्या गटात नाराजी आहे.

दुसरीकडे, काँग्रेसचे भिवंडी प्रभारी व माजी आमदार मुझफ्फर हुसैन यांनी जागांसाठी आक्रमक भूमिका घेतल्याने आघाडी होऊ शकली नाही, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसने केला आहे. त्याचवेळी राष्ट्रवादीने समाजवादी पक्षाशी हातमिळवणी केली आहे. गेल्या निवडणुकीत समाजवादी पक्षाचे १५ नगरसेवक निवडून आले होते. यंदा यापैकी काही नगरसेवकांनी शिवसेना आणि काँग्रेसमध्ये प्रवेश केल्याने समाजवादी पक्षात मोठी फूट पडली आहे. असे असले तरी राष्ट्रवादी आणि समाजवादी पक्षाची आघाडी चांगली कामगिरी करेल, असा दावा राष्ट्रवादीचे नेते व माजी खासदार संजीव नाईक यांनी केला.

६२९ अर्ज दाखल

शनिवारी उमेदवारी अर्ज भरण्याच्या अखेरच्या दिवशीपर्यंत ६२९ उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले आहेत.  या निवडणुकीत शिवसेनेने ५०, भाजपने ६०, काँग्रेसने ६५, राष्ट्रवादीने ३३, समाजवादी पार्टीने ३६,  भिवंडी डेव्हलपमेंट फ्रंटने १६, कोणार्कने १६ आणि  एमआयएमने ९ उमेदवार उभे केले आहेत. यामुळे या सर्वच पक्षांना ९० जागांवर उमेदवार उभे करता आलेले नसल्याचे स्पष्ट होत आहे. या निवडणुकीत मनसेने  एकही उमेदवारी अर्ज दाखल केला नसून शहराध्यक्ष प्रदीप बोडके यांनी प्रभाग R मांक एकमधून अपक्ष उमेदवारी अर्ज भरला असल्याची माहिती सूत्रांनी दिली.