शहर काँग्रेसच्या जम्बो कार्यकारिणीत ४६ उपाध्यक्ष, ४७ सरचिटणीस, ५४ चिटणीस

ठाणे महापालिकेची निवडणूक तोंडावर आली असताना मरगळलेल्या काँग्रेसने पक्षाची जम्बो कार्यकारिणी जाहीर करीत उशिरा का होईना पक्षबांधणीचा प्रयत्न सुरू केला आहे. महापालिकेतील ज्येष्ठ नगरसेवक मनोज िशदे यांची शहर अध्यक्षपदी नियुक्ती झाल्यानंतर पक्षातील एक मोठा गट कमालीचा अस्वस्थ असताना पक्षात फूट पडू नये यासाठी ही जम्बो कार्यकारिणी जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये ४६ उपाध्यक्ष, ४७ सरचिटणीस, ५४ चिटणीस अशी पदांची खैरात करण्यात आली आहे.

ठाणे शहरात काँग्रेसचे प्रभावी संघटन नसतानाही आहे पदाधिकारी आणि नेते दिवसरात्र एकमेकांचे पाय खेचण्यात मग्न असल्याने पक्षाची पुरती वाताहत झाली आहे. साडेचार वर्षांपूर्वी झालेल्या महापालिका निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासोबत आघाडी करूनही जेमतेम १८ जागा निवडून आलेल्या काँग्रेसचे रवींद्र फाटक यांच्यासह पक्षातील सात नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश केल्याने महापालिकेतील  संख्याबळ आणखी कमी झाले आहे.

या पाश्र्वभूमीवर आगामी निवडणुकीच्या पक्षातील काही पदाधिकारी आणि नगरसेवक शिवसेना, भाजपच्या संपर्कात असल्याची चर्चा रंगली आहे. यामुळे चिंताग्रस्त असलेल्या काँग्रेस नेत्यांनी जम्बो कार्यकारिणी जाहीर करीत कार्यकर्त्यांना चुचकारण्याचा प्रयत्न केला आहे.  काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी कार्यकारिणीची यादी जाहीर केली आहे. त्यामध्ये ठाणे शहराध्यक्षपदी मनोज शिंदे यांची नियुक्ती केली आहे तर उपाध्यक्षपदी ज्येष्ठ नगरसेवक नारायण पवार, राजण किणे यांची वर्णी लावली आहे.  ४६ उपाध्यक्ष, ४७ सरचिटणीस, ५४ चिटणीस, एक खजिनदार, २६ कार्यकारणी सदस्य, १५ सल्लागार समिती सदस्य, १९ कायम निमंत्रित सदस्य, १२ ब्लॉक अध्यक्ष, पाच प्रवक्ते, अशी ही जम्बो कार्यकारिणी आहे. यामध्ये ब्लॉक अध्यक्षपदाच्या नियुक्त्या सहा महिन्यांसाठी करण्यात आल्या आहेत.