वसई : पालघर लोकसभेची पोटनिवडणूक लढविण्याचा निर्णय काँग्रेस पक्षाने घेतला आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्षांबरोबर झालेल्या बैठकीनंतर पदाधिकाऱ्यांनी निवडणूक लढविण्यासाठी पक्षाला अनुकूल वातावरण असल्याचे पक्षश्रेष्ठींना सांगण्यात आले.

पालघर लोकसभेच्या पोटनिवडणुकीची तयारी करण्यासाठी काँग्रेसने गेल्या काही दिवसांपासून मोर्चेबांधणी केली होती. संपूर्ण जिल्हाभर कार्यकर्त्यांच्या बैठका सुरू होत्या. ही निवडणूक लढविण्यासाठी जिल्ह्य़ातील सर्व कार्यकर्त्यांनी उत्सुकता दाखवली होती. प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्याबरोबर काँग्रेस पदाधिकाऱ्यांची नुकतीच बैठक संपन्न झाली.

त्या बैठकीत निवडणुकीसाठी काँग्रेसने निवडणूक लढविण्याचा घेतलेला निर्णय घेण्यात आला. पक्षातील अनेक ज्येष्ठ नेत्यांनी उमेदवारीसाठी तयारी दर्शवली आहे. दिल्लीहून अंतिम उमेदवार घोषित केला जाणार आहे.

‘बविआ सोबत युती नाही’

वसईतील बहुजन विकास आघाडीने राज्यातील भाजप सरकारला पाठिंबा दिला आहे. त्यामुळे बविआ सोबत युती न करता स्वतंत्रपणे निवडणूक लढविण्याची पक्षातील कार्यकर्त्यांची इच्छा आहे. आम्ही संपूर्ण ताकदीनिशी ही निवडणूक लढवून जिंकून दाखवू असा विश्वास काँग्रेसचे प्रदेश सचिव विजय पाटील यांनी व्यक्त केला.

पहिला दिवस अर्जाविनाच

पालघर लोकसभा पोटनिवडणुकीच्या प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. अर्ज सादर करण्याच्या पहिल्या दिवशी एकही अर्ज दाखल झाला नाही. अर्ज दाखल करण्याची शेवटची मुदत १० मे आहे. दिवंगत खासदार चिंतामण वनगा यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या पालघरम् लोकसभा मतदारसंघासाठी पोटनिवडणुक होत आहे. येत्या २८ मे रोजी मतदान होणार आहे. गुरुवार ३ मे पासून अर्ज स्वीकारण्यास सुरुवात झाली. मात्र पहिल्या दिवशी दोन उमेदवारांनी चार अर्ज घेतले परंतु एकही उमेदवारी अर्ज दाखल झाला नसल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी प्रशांत नारनवरे यांनी दिली.