ठाण्यात मराठा क्रांती मोर्चाकडून पुकारण्यात आलेल्या बंद दरम्यान काही समाजकंटकांकडून हिंसाचार घडवण्याचा प्रयत्न सुरु होता. दगडफेक आणि जाळपोळ करणाऱ्या अशा २० जणांना ताब्यात घेण्यात आले असून त्यांची कसून चौकशी करण्यात येत आहे, अशी माहिती ठाण्याचे पोलीस आयुक्त परवीर सिंह यांनी माध्यमांशी बोलताना दिली.

आयुक्त सिंह म्हणाले, मुंबई, ठाणे आणि पालघरमध्ये आज मराठा मोर्चाकडून बंद पुकारण्यात आला होता. हा बंद शांततेत पार पडावा यासाठी मराठा आंदोलक प्रयत्नशील होते. मात्र, या बंद दरम्यान हिंसाचार व्हावा अशी इच्छा असणारे काही लोक घुसले होते. त्यांनीच दगडफेक करीत वाहनांचे नुकसान घडवून आणले आहे.

या हिंसाचारात सहभागी असलेल्या २० जणांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले असून त्यातून खरी माहिती समोर येईल. दरम्यान, आंदोलकांनी कायदा हातात घेण्याचा प्रयत्न करु नये, शांतता पाळावी असे आवाहन आयुक्त परमवीर सिंह यांनी केले आहे.

दरम्यान, आमदार नरेंद्र पाटील यांनी या आंदोलनात काही अनोळखी चेहरे घुसल्याचा संशय व्यक्त केला आहे. यामध्ये उपरे आंदोलक घुसवण्यात आले असून आंदोलन पेटवण्यासाठी भाडोत्री माणसे पाठवण्यात आली आहेत का? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला आहे.