ठाणे जिल्हा प्रशासनाची सर्व महापालिकांना सूचना

ठाणे जिल्ह्य़ातील खाडी किनारी होणारे अतिक्रमण आणि बेकायदा रेती उपशांच्या बालेकिल्ल्यांना आवर घालता यावा यासाठी मेरीटाइम बोर्डाच्या अखत्यारीत येणारे बहुतांश खाडीकिनारे स्थानिक स्वराज्य संस्थांकडे हस्तांतरित केले जावेत, अशा स्वरूपाचा प्रस्ताव ठाण्याचे जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर यांनी तयार केला आहे. कळव्यातील पारसिक रेतीबंदरावर महापालिका आणि सरकारच्या माध्यमातून तब्बल ७२ कोटी रुपये खर्च करून चौपाटी विकसित केली जाणार आहे. कल्याण रेती बंदरावरही अशाच प्रकारचा प्रकल्प उभा करावा अशी सूचना कल्याण डोंबिवली महापालिकेस करण्यात आली आहे. या धर्तीवर जिल्ह्य़ातील इतर खाडी किनाऱ्यांवर चौपाटी, बालोद्याने, कांदळवन उद्याने उभारण्यासाठी त्या त्या ठिकाणच्या महापालिकांनी पुढाकार घ्यावा, अशा सूचना कल्याणकर यांनी केल्या आहेत.

मुंब्रा, ठाणे, कल्याण, भिवंडीच्या खाडीत मोठय़ा प्रमाणावर बेकायदा रेती उपसा सुरू असताना त्याकडे मेरीटाइम बोर्डाचे अधिकारी दुर्लक्ष करतात असा वर्षांनुवर्षांचा अनुभव आहे. महसूल विभागामार्फत रेती माफियांविरोधात कारवाई होत असली तरी खाडीकिनारी उभे रहाणारे रेती बंदरांचे अड्डे उद्ध्वस्त करण्यात त्यांना अपयश येते. या पाश्र्वभूमीवर ठाणे महापालिका आणि जिल्हा प्रशासनामार्फत कळवा खाडी किनारी चौपाटी उभारण्याचा प्रस्ताव तयार करत येथील रेती व्यावसायिक तसेच बेकायदा उद्योगांना मध्यंतरी सळो की पळो करून सोडले. महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल, जिल्हाधिकारी महेंद्र कल्याणकर, पोलीस आयुक्त परमबीर सिंग या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी एकत्रित कारवाई करत येथील खाडीकिनारा अतिक्रमणमुक्त केला. अशीच योजना कल्याण रेती बंदरावर अमलात आणत या ठिकाणी चौपाटीसारखा प्रकल्प उभा करावा असा प्रस्ताव जिल्हा प्रशासनाने महापालिकेपुढे मांडला आहे. हे करत असताना जिल्ह्य़ातील इतर खाडीकिनारे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या ताब्या देऊन तेथील असे प्रकल्प उभे करावेत, अशा सूचना मेरीटाइम बोर्डाला देण्यात आल्या आहेत, अशी माहिती कल्याणकर यांनी दिली. ठाणे महापालिका पारसिक बंदरापाठोपाठ नागला तसेच शहरातील इतर खाडी किनाऱ्यांवरही चौपाटी प्रकल्प उभा करत आहे. अशा प्रकारचे प्रकल्प मीरा-भाईंदर, नवी मुंबई, उल्हासनगर, डोंबिवली येथील खाडीकिनाऱ्यांवर उभे करता येतील, अशी सूचनाही करण्यात आली आहे, असे ते म्हणाले.

रेतीमाफियांचे धाबे दणाणले

ठाणे, मुंब्रा, कल्याण, डोंबिवली, भिवंडीच्या खाडीत अमर्याद रेती उपसा करत येथील किनाऱ्यांवर बांधकामे उभारण्याचे उद्योग गेल्या काही वर्षांपासून अव्याहतपणे सुरू आहेत. भिवंडी परिसरात या भागातील एक बडा राजकीय नेता आणि त्याच्या नातेवाईकांनी बेकायदा गोदामांच्या रांगा उभ्या केल्या आहेत. मात्र, गेल्या काही दिवसांपासून जिल्हाधिकारी महेंद्र कल्याणकर यांनी कल्याण आणि आसपासच्या परिसरातील रेती माफियांविरोधात सुरू केलेल्या कारवाईमुळे या बेकायदा धंदे चालविणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.