भूमाफियांकडून बेकायदा इमारतीचे बांधकाम

डोंबिवली : डोंबिवली पश्चिमेतील गरिबाचापाडा येथील अनमोल नगरीच्या प्रवेशद्वारावर कल्याण-डोंबिवली पालिकेचा प्राथमिक शाळेसाठी ४ हजार ५०० चौरस मीटरचा आरक्षित भूखंड आहे. मागील अनेक वर्षे मोकळ्या असलेल्या या भूखंडावर दोन महिन्यांपासून भूमाफियांनी सात माळ्यांच्या टोलेजंग बेकायदा इमारत उभारणीचे काम सुरू केले आहे.

शहरातील वाढत्या लोकवस्तीचा विचार करून पालिकेने २५ वर्षांपूर्वीच्या विकास आराखडय़ात प्राथमिक शाळेसाठी आरक्षणासाठी (महसूल विभाग-शिवाजीनगर, आरक्षण क्रमांक ३१५) या भागांत भूखंड राखीव ठेवला. या भूखंडाचा मोबादला पालिकेने त्याच वेळी जमीनमालकाला दिला. हा भूखंड सुस्थितीत करण्यासाठी पालिकेने चार लाख ५० हजार रुपये खर्च केले आहेत. या भूखंडाचे संरक्षण करणे हे पालिकेच्या प्रभाग अधिकारी, नगररचना विभाग आणि अतिक्रमण नियंत्रण विभागाचे काम असताना महत्त्वाच्या जागेवरील भूखंड भूमाफियांकडून हडप केला आहे. नगररचना विभागाच्या दप्तरी या भूखंडाचे एकूण क्षेत्रफळ चार हजार ५०० दर्शविण्यात आले आहे. प्रत्यक्षात ३१ चौरस मीटरचा ताबा पालिकेने घेतला असल्याचे म्हटले आहे. गेल्या आठवडय़ात माफियांनी पेंडसेनगरमधील मैदानाचा भूखंड हडप करण्याची तयारी केली होती. याशिवाय गावदेवी भागातील बगीचा, उद्यानासाठी आरक्षित भूखंडावर टोलेजंग बेकायदा इमारतींची कामे सुरू आहेत.

अनमोल नगरीच्या प्रवेशद्वारावरील मंदार व्हिला सोसायटीसमोर चाळी तोडून या इमारतीचे काम माफियांनी सुरू केले आहे. ७ गावे, टिटवाळा, मांडा, नांदिवली, भोपर, आयरे, कोपर पूर्व, खाडी किनारा परिसरातील सरकारी, खारफुटी, सीआरझेड जमिनी हडप केल्यानंतर तेथे बांधकामे करण्यासाठी मोकळ्या जमिनी राहिल्या नसल्याने माफियांनी आता शहरातील मोक्याच्या आरक्षित भूखंडांमध्ये मोर्चा वळविला आहे.

आरक्षित भूखंड पालिकेच्या नावावर झाला की तेथे कोणाही खासगी व्यक्तीला बांधकाम करता येत नाही. कायद्याने तो गुन्हा आहे. असे असताना अनमोलनगरीच्या प्रवेशद्वारावर प्राथमिक शाळेच्या आरक्षणावर बेकायदा इमारत बांधकाम सुरू असेल तर त्याची तात्काळ पाहणी करून त्याचा अहवाल वरिष्ठांना पाठवून ते बांधकाम जमीनदोस्त करण्याची कारवाई केली जाईल.

– राजेश मोरे, नगररचनाकार, डोंबिवली

प्रशासकीय कामे करून अनधिकृत बांधकामांसंबंधी आलेल्या तक्रारींचा निपटारा करावा लागतो. आतापर्यंत १५ हून अधिक तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. अनमोलनगरीकडे सुरू असलेले बांधकाम तपासून ते जमीनदोस्त केले जाईल.

– भारत पवार, ‘ह’ प्रभाग अधिकारी