किशोर कोकणे

पारसिक बोगद्याजवळ रुळांलगत उभारणी; रुळांवर फेकला जाणारा कचरा रोखण्यासाठी उपाय

मध्य रेल्वे मार्गावरील पारसिक बोगद्याच्या कळव्याच्या दिशेने डाव्या बाजूला रेल्वे प्रशासनाने आणखी एक भिंत बांधण्यास सुरुवात केली आहे. ही भिंत रेल्वे रुळापासून काही मीटर अंतरावर असल्याने रेल्वे रुळांवर पडणारा कचरा यामुळे सहज रोखला जाईल, असा रेल्वे प्रशासनाचा दावा आहे. तसेच या भागातून रेल्वे मार्गाला असलेला धोकाही यामुळे टळू शकणार आहे. ही भिंत बांधली जावी यासाठी रेल्वे प्रवासी संघटनांकडून गेल्या काही वर्षांपासून सतत पाठपुरावा सुरू होता.

मध्य रेल्वेच्या जलद मार्गावरील प्रवासासाठी पारसिक बोगदा अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. गेल्या काही वर्षांपासून बोगद्याच्या कळव्या दिशेकडे मोठय़ा प्रमाणात बेकायदा वसाहती उभ्या राहिल्या आहेत. ठाणे महापालिकेचे या बेकायदा वस्त्यांकडे दुर्लक्ष होत असल्याने दिवसागणिक त्यामध्ये भर पडू लागली आहे. या वस्त्यांमधून राहणाऱ्या नागरिकांकडून रेल्वे रुळांवर मोठय़ा प्रमाणात कचरा फेकण्यात येतो. हा कचरा वेचण्यासाठी मध्यंतरी महापालिका प्रशासनाने मोठी यंत्रणा राबवली. त्यानंतर रेल्वे प्रवास धोकादायक ठरू नये म्हणून पाच वर्षांपूर्वी रेल्वेने बोगद्याच्या कळव्याच्या दिशेने डावी आणि उजवीकडे उंच भिंती बांधल्या. मात्र, तरीही नागरिकांकडून कचरा रेल्वे रुळांच्या दिशेने भिरकावला जात होता. त्यानंतर रेल्वे प्रशासनाने पुन्हा रेल्वे रुळाच्या उजवीकडे एक आणखी लहान भिंत बांधली होती. या भिंतीमुळे उजवीकडून फेकण्यात येणारा कचरा काही प्रमाणात रोखला जात होता. मात्र, रेल्वे रुळाच्या डावीकडे मोठी नागरी वस्ती आहे. त्या ठिकाणी रेल्वे प्रशासनाने रेल्वे रूळाच्या बाजूला भिंत बांधली नव्हती. त्यामुळे कचरा थेट रेल्वे रुळांवर पडण्याची भीती निर्माण झाली होती.

अखेर उशिराने जाग आलेल्या रेल्वे प्रशासनाने या ठिकाणी भिंत उभारणीला सुरुवात केली आहे. सुमारे अर्धा किलोमीटर लांबीची भिंत असून बोगद्याच्या प्रवेशद्वारापर्यंत ही भिंत बांधण्यात येणार आहे. त्यामुळे रेल्वे रुळांवर जाणारा कचरा या भिंतीमुळे अडला जाणार आहे. आता दोन्ही दिशेला रेल्वे रुळाकडेला छोटय़ा भिंती बांधल्या गेल्याने पारसिक बोगद्याला संरक्षण मिळणार आहे. त्यासोबतच रेल्वे रुळांभोवती कचरा फेकण्यालाही आळा बसणार असल्याची माहिती मध्य रेल्वेच्या एका अधिकाऱ्याने दिली.

भिंत तोकडी पडण्याची भीती

पारसिक बोगद्याच्या लगत दोन्ही दिशेला भिंती बांधल्या होत्या. मात्र, त्या भिंतीची उंची कमी होती. तसेच महापालिकेच्या घंटागाडय़ांच्याही फेऱ्या कमी असल्याने अनेकदा येथील रहिवासी भिंतीच्या पलीकडे कचरा फेकत. त्यामुळे रेल्वे रुळांच्या भोवताली घाणीचे साम्राज्य पसरत होते. दरम्यान, पारसिक बोगद्यावरील कळव्याकडील बाजूस असलेली बेकायदा वस्ती वाढतच असल्याने भविष्यात ही भिंतही तोकडी ठरण्याची भीती व्यक्त होत आहे.