01 March 2021

News Flash

 ‘भातसा’च्या पात्रात बेकायदा पूल

त्यातच भर म्हणून साकव बांधणे, किनाऱ्याच्या मोकळ्या जागेत बेकायदा इमारत, चाळी बांधण्याचेही काम जोरात सुरू आहे.

खडवलीजवळ भातसा नदीपात्रात बांधण्यात आलेला बेकायदा पूल.

नदीकिनारी अनधिकृत इमारत आणि चाळींचे बांधकाम

कल्याण तालुक्यातील खडवली, बेहरे गावांच्या हद्दीतून वाहणाऱ्या भातसा नदीपात्रात भूमाफियांनी गेल्या पाच ते सहा महिन्यांपासून बेकायदा पुलाची उभारणी सुरू केली आहे.

त्यातच भर म्हणून साकव बांधणे, किनाऱ्याच्या मोकळ्या जागेत बेकायदा इमारत, चाळी बांधण्याचेही काम जोरात सुरू आहे. नदीपात्रासह आसपासच्या भागात राजरोसपणे ही बांधकामे सुरू असताना जिल्हा प्रशासन तसेच स्थानिक पोलिसांकडून डोळेझाक केली जात असल्याबद्दल आश्चर्य व्यक्त होत आहे.

या भागातील जागरूक ग्रामस्थ, शिक्षकांनी ही बांधकामे रोखण्यासाठी प्रयत्न केले तसेच पोलीस ठाण्यात आणि विविध शासकीय यंत्रणांकडे तक्रारही दाखल केली. मात्र पोलीस आणि शासकीय यंत्रणांकडून दाद दिली जात नसल्याचे त्यांचे म्हणणे आहे. खडवली येथील अनुदानित आश्रमशाळेत ४५० विद्यार्थी निवासी पद्धतीने राहतात. आश्रमशाळा परिसरातील शाळेला बांधण्यात आलेली संरक्षित भिंतही बेकायदा चाळी उभारणाऱ्यांनी पाडून टाकली आहे.

रात्रीच्या वेळेत काही जण चारचाकी वाहने घेऊन आश्रमशाळेच्या पटांगणात मोठय़ाने गाणी लावून धिंगाणा घालत आहेत, अशी माहिती आश्रमशाळेचे पदाधिकारी दीपक चव्हाण यांनी दिली.

खडवलीजवळील नदीपात्रात कोणत्याही प्राधिकरणाची परवानगी न घेता भूमाफियांनी सिमेंट, लोखंडाचा वापर करून पक्का पूल (साकव) बांधला आहे. पूल बांधणाऱ्यांनी कोणत्याही प्रकारची कागदपत्रे सादर केलेली नाहीत.

हा पूल आणि खाडीलगतच्या बेकायदा बांधकामांमुळे भर पावसाळ्यात नदीचे पाणी परिसरात शिरण्याची शक्यता तलाठय़ांनी त्यांच्या अहवालात व्यक्त केली आहे.

या अहवालानंतर तहसीलदार अमित सानप यांच्या आदेशावरून महसूल विभागाने नदीपात्रातील बांधकामांवर जून महिन्यात कारवाई केली. मात्र येथील भूमाफियांनी ती बांधकामे पुन्हा उभारली असल्याचे ग्रामस्थांकडून सांगण्यात आले.

स्थानिक प्रशासन यंत्रणेला हाताशी धरून बेकायदा चाळी बांधण्याचा भूमाफियांचा विचार असून कोटय़वधी रुपये खर्च करून नदीपात्रात पूल बांधण्याचे धाडस येथील माफियांनी दाखवले असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.

नदीजवळ सुरू असलेले बांधकाम खासगी की सरकारी जमिनीवर सुरू आहे ते पाहावे लागेल. वा सरकारी जमिनीवरही बेकायदा बांधकाम झाले असेल तर त्यावर नक्की कारवाई केली जाईल. या संबंधीची तक्रार अद्याप माझ्यापर्यंत आलेली नाही.

-प्रसाद उकर्डे, प्रांत अधिकारी कल्याण

भातसा नदीत सुरू असलेल्या बांधकामांची तक्रार प्राप्त झाली आहे. संबंधितांना जमीन, बांधकामांची कागदपत्रे सादर करण्याचे आदेश दिले आहेत. कागदपत्रे सादर केली नाहीत तर त्या बांधकामांवर कारवाई केली जाईल.

-आर. एस. पांडव,  प्रकल्प अभियंता भातसा प्रकल्प

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 28, 2018 1:30 am

Web Title: construction of unauthorized bridge by the river
Next Stories
1 ..म्हणून मालिका, चित्रपटांचा  पर्याय निवडावा लागतो!
2 वसईकरांचे मेट्रोचे स्वप्न लांबणीवर
3 ‘आमचो कोळीवाडो’ भस्मसात
Just Now!
X