ठाणे शहराला बेकायदा बांधकामाचा विळखा बसलेला असतानाच आता शहरातील सांडपाणी वाहून नेणाऱ्या नाल्यांवर बेकायदा बांधकामे उभी राहिल्याचे समोर आले असून अशा बांधकामांवर पावसाळ्यानंतर पाडकाम कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी बुधवारच्या सर्वसाधारण सभेत दिली. नाल्याच्या काठावर असलेल्या घरांच्या पुनर्वसनासाठी विशेष धोरण राबविण्याचा विचार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे.
ठाणे येथील इंदिरानगर भागातील एका घराचे बांधकाम महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने पाडले असून ऐन पावसाळ्यात ही कारवाई करण्यात आल्याने भाजप नगरसेवक राजकुमार यादव यांनी प्रशासनावर टीका केली. त्या कारवाईसाठी नोटिस बजावण्यात आलेला नसल्याचा आरोपही केला. मात्र, या बांधकामावर कारवाई करण्यापूर्वी नोटिस पाठविण्यात आल्याचे अतिक्रमण विभागाने स्पष्ट केले, तरीही राजकुमार यादव यांचे समाधान झाले नाही आणि त्यांनी या कारवाईच्या मुद्दय़ावरुन प्रशासाला लक्ष्य करण्यास सुरुवात केली. अखेर महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी बांधकामावर कारवाई करण्यापूर्वी नोटिस पाठविल्याचे स्पष्ट केले. या घराचे बांधकाम नाल्यावर करण्यात आले होते. नालेसफाई करीत असताना ही बाब समोर आली. त्यावेळी नालेसफाई करताना कर्मचाऱ्यांना त्या घरातून नाल्यामध्ये प्रवेश करावा लागला. त्यामुळे नाल्यावरील या बेकायदा बांधकामावर कारवाई करण्यात आल्याचे जयस्वाल यांनी सांगितले. शहरातील अन्य भागातील नाल्यांवरही अशाप्रकारची बेकायदा बांधकामे उभी राहीली असून नालेसफाईदरम्यान ही बाब समोर आली आहे. त्यामुळे पावसाळ्यानंतर अशा सर्व बांधकामांवर कारवाई करण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, ठाणे शहरातील एक नामांकित हॉटेलचे बांधकाम नाल्यावर असून त्याच्यावरही कारवाई होणार का, असा सवाल काही लोकप्रतिनिधींनी यावेळी केला. त्यावर नाल्यावर कुणाचेही बांधकाम असो, त्याच्यावर कारवाई होणारच अशी भूमिका जयस्वाल यांनी स्पष्ट केली. तसेच नाल्याच्या काठावर वास्तव्यास असलेल्या कुटुंबांच्या जिवाला पावसाळ्यात धोका असतो. त्यामुळे या घरांच्या पुनर्वसनाकरिता विशेष धोरण राबविण्याचा विचार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे.