खारेगाव, माजिवडा परिसरात बांधकाम कचऱ्याचे ढीग; रहदारीला अडथळा

मुंबईत निर्माण होणारा बांधकामाचा राडारोडा ठाणे शहराच्या हद्दीत आणून टाकत असल्याबद्दल महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत मुद्दा उपस्थित करण्यात आला असतानाच, हा राडारोडा आता मुंबई-नाशिक महामार्गावर ‘अतिक्रमण’ करू लागल्याचे दिसून येत आहे. महापालिका तसेच जिल्हाधिकारी विभागाच्या डोळ्यादेखत महामार्गाच्या कडेला दररोज हा राडारोडा रिकामा केला जात असून यामुळे माजीवडा तसेच खारेगाव भागातील महामार्गाचा एक पदर बंद झाला आहे. त्यामुळे या राडारोडय़ाचे ढीग चुकवत वाहनचालकांना मार्ग काढावा लागत असून यामुळे ही कोंडी अधिक भयावह होत असल्याचे चित्र आहे.

मुंबई तसेच आसपासच्या परिसरात निर्माण होणारा राडारोडा ठाणे, भिवंडीच्या दिशेने खाडी किनारी आणून रिकामी केला जात असल्याच्या तक्रारी गेल्या काही वर्षांपासून सातत्याने केल्या जात आहेत. राडारोडय़ाची वाहतूक करणारी माफियांची एक मोठी साखळी या कामात कार्यरत असून या मागील अर्थकारणामुळे त्यावर कारवाई होत नसल्याची चर्चा दबक्या आवाजात सुरू असते. काही दिवसांपूर्वी आलेल्या पूरपरिस्थितीस रस्त्याच्या कडेला, नाले, गटारे बुजवून टाकण्यात आलेला हा राडारोडा कारणीभूत असल्याचा आरोप ठाणे महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत सर्वपक्षीय नगरसेवकांकडून करण्यात आला होता. त्यावर महामार्गाच्या कडेला अशा प्रकारे राडारोडा रिकामा केला जात आहे, अशी कबुली अतिक्रमण विभागाच्या उपायुक्तांनी दिली होती. दरम्यान, मुंबई-नाशिक महामार्गावर भिवंडीच्या दिशेने होणाऱ्या वाहन कोंडीसही राडारोडा कारणीभूत असल्याचे चित्र असून रस्त्याचे काही पदर यामुळे अडविले जात असल्याचे दिसून येत आहे.

ठाण्यातील मुंबई नाशिक महामार्गावरील माजीवडा आणि खारेगाव नाक्यावर टाकण्यात आलेल्या राडारोडय़ाचा परिणाम ठाण्याहून नाशिक, भिवंडी, कल्याणच्या दिशेने ये-जा करणाऱ्या हजारो वाहनचालकांना सहन करावा लागत आहे. येथील

दोन्ही बाजूकडील रस्त्यावर रात्री-बेरात्री इमारतीच्या बांधकामांनंतर निर्माण होणारा राडारोडा, फरशा यांचा भराव टाकला जात आहे. त्यामुळे या सुमारे २५ ते ३० मीटरच्या रस्त्यांपैकी सुमारे १५ मीटरचा मार्ग शिल्लक आहे. मात्र, मार्ग अरुंद झाल्याने दररोज या मार्गावर वाहतूक कोंडीचा सामना वाहन चालकांना सहन करावा लागत आहे. याप्रकरणी महापालिकेचे अतिक्रमण विभागाचे उपायुक्त अशोक बुरपुल्ले यांच्याशी वारंवार संपर्क साधण्याचा प्रयत्न करूनही होऊ शकला नाही.

मी अनेकदा घोडबंदरहून मुब्रा येथे जाण्यासाठी या मार्गाचा वापर करतो. रस्त्याच्या दोन्ही बाजूला राडारोडय़ाचा भराव टाकण्यात आला आहे. त्यामुळे उन्हाळ्यात धुळीचा तर, पावसाळ्यात वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो. या राडारोडय़ामुळे रस्त्याचा अर्धा भाग व्यापला आहे. त्यामुळे रस्त्यावरील वाहतुकीवर त्याचा सर्वाधिक परिणाम होत आहे.

– रोहन कांबळे, दुचाकीस्वार.