24 October 2020

News Flash

मेट्रो मार्गात बांधकामे सुरूच

मुंबई महानगर विकास प्राधिकरणाने भिवंडी-कल्याण मार्गावर मेट्रो मार्गिकेची आखणी केली आहे.

|| भगवान मंडलिक

‘एमएमआरडीए’च्या संचालकांकडून गंभीर दखल :- कल्याणमधील मेट्रो मार्गिकेत सुरू केलेली बांधकामे विकासकांनी तातडीने थांबवावीत, असे स्थगिती आदेश कल्याण-डोंबिवली पालिकेच्या नगररचना विभागाने १२ विकासकांना दिले आहेत. तरीही या विकासकांनी मेट्रो मार्गाला अडथळा ठरतील अशा पद्धतीने टोलेजंग इमारतींची कामे सुरूच ठेवली आहेत. महानगर प्राधिकरणानेही या प्रकाराची गंभीर दखल घेत महापालिकेस इशारा पत्र पाठविले आहे.

मुंबई महानगर विकास प्राधिकरणाने भिवंडी-कल्याण मार्गावर मेट्रो मार्गिकेची आखणी केली आहे. तीन वर्षांपूर्वी प्राधिकरणाने कल्याण डोंबिवली पालिकेला पत्र पाठवून कल्याण शहरातून जात असलेल्या प्रस्तावित मेट्रो मार्गिकेत कोणत्याही प्रकारच्या नवीन, पुनर्निमाणाच्या बांधकामाला परवानगी देऊ नये आणि अशाप्रकारची बांधकाम परवानगी द्यायची असेल तर प्रथम संबंधित विकासकांनी प्राधिकरणाची ‘ना हरकत’ घेण्याचे सूचित केले होते. पालिकेच्या नगररचना विभागाने या महत्त्वाच्या पत्राकडे सुरुवातीला कानाडोळा केला. तसेच प्रस्तावित मेट्रो मार्गात १२ विकासकांच्या नवीन, सुधारित बांधकामांना परवानगी दिली. यासंदर्भात माहिती कार्यकर्ते मनोज कुलकर्णी यांना प्राधिकरणाकडे तक्रार केली. या तक्रारीची गंभीर दखल प्राधिकरणाच्या मेट्रो विभागाच्या संचालकांनी घेतली आहे. याठिकाणी बांधकाम प्रकल्प उभे राहात असल्याचे लक्षात येताच प्राधिकरणाने यापूर्वीच महापालिकेस इशारापत्र पाठविले आहे. त्यामुळे खडबडून जागे झालेल्या महापालिका प्रशासनाने हे प्रकरण अंगलट येत असल्याचे दिसताच नगररचना विभागात तीन वर्षे काम केलेल्या विद्यमान, बदलून गेलेल्या अभियंत्यांना आयुक्त, साहाय्यक संचालक यांनी कारणे दाखवा नोटिसा काढल्या. या प्रकरणात एका वरिष्ठ अधिकाऱ्यासह या विभागातील चार ते पाच अधिकारी चौकशी आणि कारवाईच्या फे ऱ्यात अडकतील, असे प्राधिकरणाच्या एका वरिष्ठाने सांगितले.

‘एमएमआरडीए’ या प्रकरणात आक्रमक होत असल्याचे लक्षात आल्याने नगररचना विभागाचे साहाय्यक संचालक मारुती राठोड यांनी मेट्रो मार्गिकेत बांधकाम परवानगी दिलेल्या १२ विकासकांना नोटिसा पाठवून सुरू असलेले बांधकाम त्वरित स्थगित करावे. हे काम सुरू करण्यासाठी प्राधिकरणाकडून ‘ना हरकत पत्र’ (एनओसी) घेऊन यावे, असे कळविले आहे. काही विकासकांनी प्राधिकरणाच्या मुंबईतील कार्यालयात जाऊन तेथून ‘एनओसी’ घेण्याचा प्रयत्न केला, तेथे त्यांना कोणी दाद देत नाही. पालिका, प्राधिकरणाकडून आता सहकार्य मिळण्याची शक्यता नसल्याने मेट्रो मार्गात बांधकामे करणाऱ्या विकासकांनी बांधकामे पूर्ण करून ठेवू या इराद्याने वेगाने ही बांधकामे पूर्ण करण्याची घाई चालवली आहे.

स्थगिती आदेश असताना विकासक बांधकाम करीत असल्याची तक्रार माहिती कार्यकर्ते कुलकर्णी यांनी प्राधिकरणाचे मेट्रो विभागाचे संचालक प्रमोद आहुजा यांच्याकडे केली आहे. आहुजा यांनी गंभीर दखल घेत आहोत, असे त्यांना कळविले आहे.

स्थगिती असलेली बांधकामे

गौतम दिवाडकर-वास्तुविशारद शोभना देशपांडे, मोहन आघारकर-वास्तुविशारद अनिरुद्ध दास्ताने, विनोद सच्चानंदानी-वास्तुविशारद अनिल निरगुडे, सूर्यकांत संगोई-नरेंद्र पाठक-वास्तुविशारद जॉन वर्गिस, हरिलाल-लीलावती ठक्कर-वास्तुविशारद डी. एम. दळवी, विवेक शर्मा-गिरिधर कोलते-वास्तुविशारद सतीश कानडे, अय्युब खान-वास्तुविशारद शिरीष नाचणे, गणेश तांदळे-प्रीतेश पटेल-वास्तुविशारद शोभना देशपांडे.

जोखमीवर बांधकाम सुरू

महापालिकेने आम्हाला ‘एनओसी’संदर्भात पूर्वकल्पना देण्याची गरज होती. कामे सुरू झाल्यावर एनओसी आणण्यास सांगितले जात आहे. स्थगिती आदेश दिले जात असतील तर आम्ही आमच्या जोखमीवर ही कामे पूर्ण करू. यापुढे काही होईल त्यास आम्ही तोंड देऊ, असे या विकासकांचे म्हणणे आहे, असे एका पालिका अधिकाऱ्याने सांगितले.

मेट्रो मार्गातील सर्व बांधकामांना स्थगिती आदेश दिले आहेत. ही बांधकामे स्थगिती आदेश असताना सुरू असतील तर ती त्या विकासकांच्या जोखमीवर सुरू आहेत. या विकासकांनी पालिकेला पत्र देऊन आम्ही या प्रकल्पांमध्ये गुंतवणूक केली आहे. त्यामुळे ‘एनओसी’ किंवा इतर काही विषय असेल तर त्याचे अनुपालन करण्याची जबाबदारी यापुढे आमची असेल असे पालिकेला कळविले आहे. पालिकेने कारवाईची भूमिका पार पाडली आहे.  -मारुती राठोड, साहाय्यक संचालक, नगररचना विभाग

आम्ही या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे. बांधकामे थांबवा असे कळवूनही त्याची दखल घेण्यात आली नसेल तर केलेल्या नियमभंगाची शिक्षा त्यांना भोगावी लागेल. -प्रमोद आहुजा, संचालक, एमएमआरडीए, मेट्रो प्रकल्प

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 7, 2019 1:48 am

Web Title: construction work on the metro route underway akp 94
Next Stories
1 संशयित रुग्णाची माहिती देणे बंधनकारक
2 भाज्या, डाळी महागल्या
3 अरे काय चाललंय : एकाच दिवसात उड्डाणपूलाचं नेत्यांनी केलं तीन वेळा उद्घाटन
Just Now!
X