डोंबिवलीतील नांदिवली पंचानंदमधील बेकायदा बांधकामांना पालिका अधिकाऱ्यांचे अभय

डोंबिवली पूर्वेतील नांदिवली पंचानंद येथे पालिकेच्या पथकाने गेल्या महिन्यात एक बेकायदा इमारत तोडण्याची कारवाई केली होती; मात्र आता या इमारतीची नव्याने उभारणी सुरू झाली असून त्याबद्दल रहिवाशांनी आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

एमआयडीसी, एमएमआरडीएने या भागातील तीन ते चार बेकायदा इमारती जमीनदोस्त केल्याने भूमाफिया हादरून गेले होते. त्यात नांदिवली पंचानंद येथील एक सात मजली बेकायदा इमारत कल्याण डोंबिवली पालिकेने जमीनदोस्त करण्याची कारवाई केली होती.

नांदिवली पंचानंदमधील विकासक राजेंद्र सिंग, दिनेश पाटील यांनी ही इमारत बांधली होती. आयुक्त ई. रवींद्रन यांच्या आदेशावरून अतिक्रमण नियंत्रण विभागाचे उपायुक्त सुरेश पवार, ई प्रभाग अधिकारी प्रभाकर पवार व पथकाने या इमारतीला पहिल्या माळ्यापासून तोडण्यास सुरुवात केली होती. पालिका अधिकाऱ्यांचे ‘लक्ष्मीपूजन’ करूनही इमारतींवर कारवाई झाल्याने भूमाफिया चवताळले होते. पाडकाम कारवाई पथकातील एक अधिकारी तर भ्रमणध्वनी बंद करून गायब झाला होता. उपायुक्त पवार यांची घटनास्थळी येताना तारांबळ उडत होती. इमारत बांधकाम पूर्ण झाल्यानंतर पालिकेने तोडकामाची कारवाई केल्याने इमारतीमधील खिडक्या, तावदाने यांचे नुकसान होत होते. ही कारवाई सुरू असताना विकासकाने पालिका अधिकाऱ्यांना ही इमारत स्वत:हून पाडतो. इमारतीला बसविलेल्या खिडक्या, तावदाने, दरवाजे काढून घेतो, असे सांगून कारवाई थांबवण्यात ‘यश’ मिळविले होते.

दरम्यानच्या काळात पालिका मुख्यालयातील दोन अधिकाऱ्यांनी ‘हस्तक्षेप’ करून ई प्रभाग कार्यालयाच्या सहकार्याने नांदिवली पंचानंद या बेकायदा इमारतीवर पुन्हा कारवाई होणार नाही, अशी ‘व्यवस्था’ केली. एका अधिकाऱ्याने या इमारतीत सदनिका घेतल्याची गावात चर्चा आहे. उपायुक्तांना, प्रभाग अधिकाऱ्यांना हाताशी धरून दलालांतर्फे २७ गावांमधील बेकायदा बांधकामांना नोटिसा पाठविणे आणि नंतर तडजोडी करणे, असे उद्योग करीत असल्याची चर्चा आहे.

नांदिवलीतील विकासकाने इमारतीच्या तोडलेल्या भागाला हिरवी जाळी लावून आतून बांधकाम पूर्ण करून घेतले आहे. इमारतीच्या तळाचा भाग तोडल्याने तो कमकुवत झाला आहे. असे असताना त्याच भागाला पुन्हा जोड देऊन विकासकाने भिंती टाकल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. जोडलेला भाग हा इमारतीला टेकू देईल; पण कायमस्वरूपी साथ देईल असे नाही, असे एका वास्तुविशारदाने सांगितले.

ही बेकायदा इमारत नव्याने सजवून झाल्यानंतर रहिवासी या इमारतीत राहण्यास येतील. पण ते सदनिकेत न राहता मृत्युगोलात राहतील असे या बेकायदा इमारतीचे भवितव्य आहे, अशी भीती काही विकासक, वास्तुविशारदांनी व्यक्त केली आहे. नांदिवली पंचानंद भागात सुमारे साठ ते सत्तर बेकायदा इमारती विकास आराखडय़ातील रस्ता, आरक्षित, सरकारी जमिनीवर ठोकण्यात आल्या आहेत. या बेकायदा बांधकामांची नगरविकास विभागाकडे एका जागरूक नागरिकाने तक्रार केली आहे. त्यामुळे या इमारतींचे भवितव्य अंध:कारमय आहे, अशी चर्चा आहे.

बेकायदा बांधकामांमधून स्थानिक नगरसेवकांना विकासकांकडून वाटा मिळत असल्याने तेही या विषयावर गुपचिळी धरून बसत असल्याचे समजते. नांदिवलीतील बेकायदा इमारत तोडूनसुद्धा विकासकाने पुन्हा उभी केल्याबद्दल आयुक्त ई. रवींद्रन काय भूमिका घेतात याकडे रहिवाशांचे लक्ष लागले आहे.

नांदिवली, देसलेपाडा येथील पालिकेने कारवाई केलेल्या बेकायदा इमारती पुन्हा उभ्या करण्यासाठी माफिया सरसावले आहेत. पाऊस सुरू कधी सुरू होतो याची हे माफिया वाटत पाहत आहेत. ‘एमआयडीसी’चे अधिकारी आजदे गावातील इमारत जमीनदोस्त करतात.

‘एमएमआरडीए’चे अधिकारी कोळे गावातील इमारती जमीनदोस्त करतात. मग पालिकेचे अधिकारी भूमाफियांना का संरक्षण देत आहेत, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

अधिकाऱ्यांचे मौनव्रत 

अतिक्रमण नियंत्रण विभागाचे उपायुक्त सुरेश पवार, ई प्रभागाचे प्रभाग अधिकारी प्रभाकर पवार यांच्याशी सतत संपर्क करूनही त्यांच्याकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही.