अवघ्या दोन खोल्यांमध्येच कारभार; कागदपत्रे गहाळ होण्याची भीती
संपूर्ण ठाणे आणि पालघर जिल्हय़ातील ग्राहक मंचात दाखल होणारे ग्राहकांचे खटले सोडविणाऱ्या ठाणे ग्राहक निवारण मंचाला कार्यालयीन कामासाठी जागा कमी पडत असल्याने त्याचा परिणाम ग्राहकांच्या खटल्यांवर होत असल्याचे चित्र सध्या दिसू लागले आहे. ग्राहकांच्या हितासाठी केंद्र शासनातर्फे ग्राहक मंचाने १९८६ साली ग्राहक तक्रार निवारण मंचाची स्थापना केली. मात्र, अजूनही या मंचाला पुरेशी जागा मिळालेली नाही.
जिल्हा अधिकारी कार्यालयाच्या चौथ्या मजल्यावर या ग्राहक मंचचा कारभार चालतो. अवघ्या दोन खोल्यांमध्येच हे खटले चालवावे लागत असल्यामुळे एका खोलीत एकामागोमाग एक असे ३० ते ४० खटले दिवसाला चालवले जातात. एका खटल्याची सुनावणी व्हायला साधारणत: अर्धा ते एक तास सहज जातो. या न्यायालयाच्या कामकाजाची वेळ ४.३० वाजेपर्यंत असल्याने एका दिवसाला नियोजित केलेल्या ३० ते ४० खटल्यांची सुनावणी तेथे जागेअभावी होऊ शकत नसल्याचा आरोप ग्राहक तक्रार निवारण करणाऱ्या ठाणे जिल्हय़ातील वकिलांच्या संघटनेने केला आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या संबंधित अधिकाऱ्यांना भेटून अनेक वर्षांपासून मोठी जागा उपलब्ध करून द्यावी, असेही या वकिलांतर्फे वारंवार सांगण्यात येत आहे. मात्र याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याचे समोर आले आहे. एका दिवशी अनेक खटले नियोजित केल्याने या ठिकाणी नेहमीच गर्दी होत असते. अशा वेळी पालघर, वसईहून न्याय मिळण्याच्या अपेक्षेने आलेले ग्राहक तसेच वकील यांना बसायला जागाही नसल्याने तासन्तास उभे राहावे लागते. त्यामुळे वकिलांची अचानकपणे तारांबळ उडाल्याचे दृश्य येथे हमखास पाहावयास मिळत आहे. त्यामुळे कमीत कमी एखादा फलक बसवून खोलीत चालू असलेल्या खटल्याचा किमान क्रमांक तरी त्या फलकावर लिहावा, असे ग्राहक निवारण वकील संघटनेचे उपाध्यक्ष अ‍ॅड. संजय म्हात्रे यांनी ठाणे ‘लोकसत्ता’शी बोलताना सांगितले.
शिवाय फायलिंगसाठीही येथे जागा कमी पडत असल्याचे चित्र दिसत आहे. यामुळे एखादा खटल्याचा पेपर गहाळ होण्याची शक्यता नाकारता येत नसल्याचे अ‍ॅड. माधवी नाईक यांनी सांगितले. असे झाल्यास जबाबदार कोण आणि ग्राहकांना कसा न्याय द्यावा, असा प्रश्नही उपस्थित करण्यात आला आहे.

खटल्यांना उशीर
तक्रार नोंदविल्यापासून जास्तीत जास्त ३-६ महिन्यांत न्याय मिळावा, असा कायदा ग्राहक तक्रार निवारण मंचातर्फे लागू करण्यात आला आहे; परंतु या सर्व गोष्टींमुळे येथे एका खटल्याची सुनावणी व्हायला बराच कालावधी लागत असल्याचे समोर आले आहे. महाराष्ट्र राज्यातर्फे येथे ग्राहकांच्या हितासाठी एक कार्यकारिणी जाहीर करण्यात आली असून ग्राहक मंचाच्या कार्यालयात जागा कमी पडत असल्याने याचा पाठपुरावा करणार असून ग्राहकांना लवकरात लवकर न्याय मिळवून देण्याचे कार्य ही संस्था करेल, असे संस्थेचे अध्यक्ष एम.पी. नाईक यांनी सांगितले.