नवा कोरा मोबाइल संच घेतल्यापासूनच खराब होता, मात्र तरीही तो बदलून न देणाऱ्या डोंबिवलीतील मीडिया एन्टरप्रायजेसला ग्राहक मंचने धडा शिकविला आहे. संबंधित ग्राहकाला १३ हजार रुपये किमतीचा दुसरा नवा मोबाइल, तसेच मानसिक त्रासापोटी तीन हजार रुपये भरपाई देण्याचे आदेश ग्राहक न्यायालयाने दिले आहेत.
स्वप्निल राजेश अदेप यांनी १७ फेब्रुवारी २०१३ रोजी पांढऱ्या रंगाचा एक्सपोरिया मायरो व्हाइट या कंपनीचा मोबाइल मॉडेल क्रमांक एसटी २३ हा मोबाइल फोन १३ हजार रुपये किमतीला खरेदी केला होता. मोबाइलचा वॉरंटी कालावधी १७ फेब्रुवारी २०१४ पर्यंत होता. अदेप यांनी वॉरंटी कालावधीत मोबाइल अचानकपणे बंद पडणे, त्याचा डिस्प्ले जाणे, तो पुन्हा सुरू न होणे, टच स्क्रीन इत्यादींबाबत दुकानदारांकडे अनेक वेळा दुरुस्त करण्यासाठी दिला. त्या वेळी वारंवार नादुरुस्त होणारा हा मोबाइल बदलून द्यावा, अशी अदेप यांची मागणी दुकानदाराने धुडकावली. तेव्हा त्यांनी ग्राहक न्यायालयात धाव घेतली. न्यायालयाने नोटीस देऊनही दुकानदार सुनावणीच्या वेळी गैरहजर राहिला. त्यामुळे न्यायमूर्ती स्नेहा म्हात्रे यांनी उपरोक्त निकाल दिला आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on March 10, 2016 1:20 am