विरार, नालासोपारा भागांतही गंभीर परिस्थिती; साथीच्या आजारांची भीती

वसई : महापालिका परिसरात करोनाच्या संकटापाठोपाठ दूषित पाण्याचे संकट नागरिकांसमोर उभे राहत आहे. वसई-विरार शहरातील विविध भागांत पालिकेतर्फे  दूषित पाणीपुरवठा होत असल्याचे समोर आले आहे.

सध्या पावसाळाही सुरू झाला असतानाच वसई, विरार, नालासोपारा या विविध ठिकाणच्या भागांत दूषित पाण्याचा पुरवठा होऊ  लागला आहे. आधीच करोनाच्या संकटामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. त्यातच आता दूषित पाणी येत असल्याने विविध प्रकारच्या आजारांच्या समस्या निर्माण झाल्या आहेत. पालिकेकडून सोडल्या जाणाऱ्या दूषित पाण्यामुळे नागरिकांवर विकतचे पाणी पिण्याची वेळ आली आहे.

पाणी दूषित येत असल्याबाबत अनेकवेळा पालिकेकडे तक्रारी केल्या जातात, मात्र या भागाला ज्या जलवाहिन्यांतून पाणीपुरवठा होतो त्या जलवाहिन्या सुस्थितीत आहेत की नाही. किंवा काही काही भागांत जलवाहिन्यांना छोटी छोटी छिद्रे पडतात, त्यातून माती जाते त्यामुळेही असे दूषित पाणी येत असावे. यासाठी पालिकेने याची योग्य ती तपासणी करून नागरिकांना शुद्ध पाणी कसे मिळेल याकडे लक्ष द्यावे, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. या पाण्यामुळे साथीच्या आजारांचा धोका निर्माण झाला आहे.  नालासोपारा येथील रहिवासी संदीप दुबे यांनी सांगितले की, मागील काही दिवसांपासून सतत महापालिकेकडून गढूळ आणि अस्वच्छ पाण्याचा पुरवठा होत आहे. विरार येथील कारगिल नगर परिसरात राहणाऱ्या स्थानिकांना आधीच एक दिवसाआड पाणी येते आणि त्यातही दूषित पाणी येत असल्याने नागरिकांत संतापाचे वातावरण आहे. कारगिल नगर परिसरात मोठय़ा प्रमाणात चाळीच्या वस्ती आहेत. या वस्तीत नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी महापालिकेच्या पाण्यावरच अवलंबून राहावे लागते. त्यातही केवळ १ ते दीड तास पाणीपुरवठा केला जातो.

अतिवृष्टीमुळे पाणी गढूळ

मागील काही दिवसांपासून पालघर जिल्ह्यात पावसाने जोर धरला आहे. त्यामुळे महानगरपालिकेस पाणीपुरवठा करणाऱ्या सूर्या धरणाच्या मासवन पंपिंग स्टेशन येथील जुन्या आणि नवीन योजनेच्या जॅकवेलमध्ये अतिवृष्टीमुळे नदीतून वाहून येणारा गाळ व इतर वस्तू जॅकवेलमध्ये जमा होऊन दोन्ही योजनेचे पंप बंदिस्त होत आहेत. त्यामुळे ते वारंवार जाऊन स्वच्छ करावे लागत असल्याने शहरात होणारा पाणीपुरवठाही अनियमित होत आहे. तसेच अतिवृष्टीमुळे नदीतील पाणी गढूळ झाले असल्याने धुकटन येथील शुद्धीकरण केंद्रात पाणी शुद्ध करण्यात येत असले तरी नागरिकांनी पाणी उकळून व गाळून प्यावे, असे पालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडून सांगण्यात आले आहे.