रासायनिक प्रक्रिया करणाऱ्या कंपनीच्या बेपर्वाईमुळे वावेघरमधील शेतकऱ्यांचे नुकसान

वाडा तालुक्यातील वावेघर या गावानजीक ‘ब्लू बेरी अँग्रो प्रॉडक्ट’ या कंपनीतून सोडल्या जाणाऱ्या दूषित पाण्यामुळे येथील विहिरी, कूपनलिका यांचे पाणी दूषित झाले आहे. याच वेळी या कंपनी परिसरातील भातपिकेही या दूषित पाण्यामुळे धोक्यात आली आहेत.

पाच वर्षांपासून ही कंपनी वावेघर गावानजीक सुरू आहे. या कंपनीत चहा पावडरवर प्रक्रिया करून अन्य पदार्थ बनविले जातात. या कंपनीतून बाहेर पडणाऱ्या कचऱ्याची विल्हेवाट यापूर्वी कंपनीच्या आवारात केली जायची; पण कंपनीचा विस्तार मोठय़ा प्रमाणावर वाढल्याने कंपनीतून निघणारा घाणकचरा व दूषित पाणी या कंपनीलगत असलेल्या जाधवपाडा येथे व लगतच असलेल्या शेतकऱ्यांच्या शेतजमिनीमध्ये सोडले जाते.

या दूषित पाण्यामुळे येथील कूपनलिकाद्वारे येणाऱ्या पाण्याला उग्र वास येतो. तसेच कंपनीच्या संरक्षक भिंतीलगत टाकल्या जाणाऱ्या कचऱ्यालाही उग्र वास येऊन येथील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. कंपनीमधून सोडल्या जाणाऱ्या दूषित पाण्यामुळे येथील शेतकऱ्यांच्या भाताची रोपे करपून गेली आहेत. याबाबत येथील ग्रामपंचायत, तलाठी यांनी वारंवार संबंधित कंपनी व्यवस्थापनाला सूचना दिलेल्या आहेत, मात्र त्याची आजवर दखल घेतलेली नाही. या कंपनीतून निघणारे दूषित पाणी तातडीने बंद करण्याची मागणी कंपनी व्यवस्थापनाकडे करण्यात आली आहे. याशिवाय शेतकऱ्यांना भरपाईही देण्यात यावी, असे स्पष्ट करण्यात आल्याचे वावेघरमधील प्रकाश ठाकरे यांनी सांगितले.

ही कंपनी नैसर्गिक उत्पादने बनवते. त्यामुळे नागरिकांना याचा त्रास होण्याचा काहीही संबंध नाही. आम्ही तशी काळजीही घेत आहोत. सध्या जे साहित्य कंपनी आवारात आहे, त्याची आम्ही लवकरच कंपनी आवारातच विल्हेवाट लावणार आहोत.   – गौरव ढागा,  ब्लूबेरी कंपनी मालक