दरुगधीयुक्त पाण्यामुळे नागरिकांत भीतीचे वातावरण

विरारमधील फुलपाडा परिसरात काही दिवसांपासून दूषित पाणीपुरवठा होत आहे. या भागातील इमारतींना गढूळ आणि दरुगधीयुक्त पाणी येत असल्याने नागरिकांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

वसई-विरार पालिकेच्या वतीने शहरातील विविध भागांत पाणीपुरवठा केला जात आहे. विरारमधील फुलपाडा परिसरातील ब्लू स्काय लाइन या इमारतीत मागील काही दिवसांपासून अतिशय गढूळ आणि दरुगधीयुक्त पाणी येत असल्याने त्यांनी पालिकेकडे तक्रार केली. या अगोदर विरार कारगिल नगर, मनवेल पाडा, नालासोपारा पूर्व महेश पार्क या परिसरातही गढूळ पाणी येत असल्याच्या तक्रारी नागरिकांनी केल्या आहेत. गढूळ पाण्यामुळे काही नागरिकांना विकत पाणी घ्यावे लागत असल्याचे स्थानिक रहिवाशी राजेश राऊत यांनी सांगितले.

पालिकेमार्फत पाणीपट्टी कर वेळोवेळी वसूल केला जातो मग स्वच्छ व शुद्ध पाणी नागरिकांना पुरविणे पालिकेची जबाबदारी आहे. अशुद्ध पाणी मिळत असल्याने नागरिकांना विविध प्रकारच्या आजाराची लागण होऊन नागरिकांचे आरोग्य धोक्यात येण्याची शक्यता आहे. यासाठी पालिकेने याकडे लक्ष घालून योग्य ती उपाययोजना करण्यात यावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. दूषित पाण्यामुळे  कावीळ, अतिसार, गॅस्ट्रो आदी आजार होण्याची शक्यता जास्त आहे. यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.

आम्ही फुलपाडा येथे पाहणी केली आहे. तातडीने या विभागातील जलवाहिनी तपासणीचे काम हाती घेतले आहे, तसेच इतर ठिकाणीही काम सुरू आहे. पावसाळ्यात असे प्रकार होऊ  शकतात, पण नागरिकांनी त्वरित पालिकेशी संपर्क करावा.– माधव जवादे, शहर अभियंता, पालिका